Child Rescue Operation : खेळता खेळता दरवाजा लॉक झाला अन्… चिमुकल्या जिजासाठी अग्निशमन दलाचे जवान बनले ‘देवदूत’
Child Rescue Operation : संत तुकाराम नगरमधील थरार: दरवाजा तोडला असता तर मुलगी घाबरली असती, जवानांनी अत्यंत कौशल्याने राबवले बचावकार्य.

Child Rescue Operation – घरभर निरागसपणे बागडणारी दीड वर्षांची जिजा अचानक बंद खोलीत अडकली आणि काही क्षणांतच आनंदी घरावर भीतीचे सावट पसरले. दरवाजा आतून लॉक झाला होता. बाहेर आई-वडिलांचा आक्रोश सुरू होता. आत चिमुकली घाबरून रडत होती. संत तुकाराम नगर परिसरातील हा थरार पाहून परिसरातील नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला.
मात्र, अशा वेळी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान देवदूतासारखे धावून आले आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांनी जिजाला सुखरूप बाहेर काढत कुटुंबाला मोठा दिलासा दिला. पिंपरीतील डी. वाय. पाटील कॉलेजशेजारी संत तुकाराम नगर येथे स्वप्निल घोटकुळे यांचे कुटुंब राहते. मंगळवारी (दि. ५ मे) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांची दीड वर्षांची मुलगी जिजा घरात खेळत होती.
खेळण्याच्या नादात अचानक खोलीचा दरवाजा बंद झाला. कडी आतून अडकली. काही क्षण पालकांना काय करावे हेच सुचत नव्हते. आई दरवाजाबाहेरून जिजाला आवाज देत होती. आतून चिमुकलीचा रडण्याचा आवाज येत होता. वडिलांनी दरवाजा उघडण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, प्रत्येक क्षणासोबत भीती वाढत होती. परिसरातील नागरिकही मदतीला धावले. अखेर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. दरवाजा तोडल्यास चिमुकली घाबरण्याची शक्यता होती. त्यामुळे जवानांनी शांतपणे आणि अत्यंत कौशल्याने बचावकार्य सुरू केले. बाहेरील खिडकीतून ‘सिलिंग हुक’च्या सहाय्याने दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर दरवाजा उघडला आणि रडत असलेली जिजा जवानांच्या हातात सुरक्षित आली.
बाहेर येताच आईने तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. “आज आमच्या मुलीला दुसरे आयुष्य मिळाले,” अशी भावना जिजाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. तर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन जवानांवर कौतुकाचा वर्षाव केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा संकटसमयी माणुसकीचा हात पुढे करत आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.




