Indrayani River: इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी! औद्योगिक वसाहतीत पाणी; नदीकाठच्या गावांना इशारा
Indrayani River: खेड तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या जलस्तरात मोठी वाढ; एमआयडीसी क्षेत्रातील सखल भाग जलमय.

Indrayani River – गेल्या आठवडाभरापासून खेड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या जलस्तरात मोठी वाढ झाली असून औद्योगिक क्षेत्रासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. रस्त्यांवरील खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अनेक दुचाकी पाण्यात बंद पडत आहेत. त्यामुळे कामगार, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
औद्योगिक क्षेत्रात काम करणार्या चाकरमान्यांना कंपन्यांमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. औद्योगिक तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि कामगारांकडून होत आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकिनारी जाणे टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी साचल्याने अपघातांचा धोका
सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खड्डे पूर्णपणे झाकले गेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचार्यांना मोठी कसरत करावी लागत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. नागरिकांनी आवश्यक तेव्हाच प्रवास करावा आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




