Pusegaon News: पुसेगावकरांचा मोठा निर्णय! बाह्यवळण रस्त्याला ठाम विरोध; ग्रामसभेत नक्की काय घडलं?
Pusegaon News: सेगाव येथील सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्यासाठी बायपास रस्ता नाकारत अंतर्गत रस्त्यासाठी जागा देण्याचे ग्रामसभेत आवाहन.

Pusegaon News – येथील बाजारपेठेतून जात असलेल्या सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे केवळ सत्तर मीटर रखडलेले काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्यासाठी राजकारण बाजूला सारून देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ प्रयत्नशील राहू, अंतर्गत रस्त्याकडेच्या बाधितांनी सव्वा महिन्यात आपल्या मर्जीने या कामासाठी लागणारी जागा उपलब्ध करून द्यावी. विविध माध्यमातून बाधितांना अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन देत सध्या तरी बाह्य वळण रस्त्याच्या कामाला पुसेगावकरांचा विरोध आहे,
असे ठाम मत डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केले. गावाच्या मुख्य बाजारपेठेतून सध्या जात असलेल्या याच राष्ट्रीय महामार्गचे रखडलेले केवळ साठ ते सत्तर मीटर कामाबाबत तोडगा काढण्यासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगिरी हॉलमध्ये झालेल्या ग्रामसभेत माजी चेअरमन डॉ सुरेश जाधव बोलत होते.
यावेळी विद्यमान चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, ग्रामपंचायत प्रशासक विशाल जाधव, ट्रस्टचे माजी चेअरमन, बाजार समितीचे सदस्य, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाह्य वळण रस्त्याला सर्वच ग्रामस्थांनी विरोध केला असून तसा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
वाढती वाहतूक आणि शहरातील सध्याची मर्यादित क्षमता लक्षात येऊन घेऊन पुढील वीस-पंचवीस वर्षांनी हीच समस्या पुसेगावकरांना भेडसावणार आहेच; मात्र तालुक्यातील मुख्य बाजारपेठ व देवस्थान असल्याने बायपास न करता पर्यायी वाहतूक व्यवस्था होणे महत्त्वाचे आहे. गावातून रस्ता व्हावा म्हणून स्वतःची घरे पाडून या कामाला मदत केली असल्याचे माजी चेअरमन रणधीर जाधव यांनी सांगितले.





