Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात यंदा पुन्हा डीजेचा जाच! कोल्हापूर-पुण्याचा विरोध, पण सातार्यात मंडळांचा अजब हट्ट
Ganeshotsav 2026: धोकादायक इमारती आणि रुग्णालयांचा प्रश्न ऐरणीवर. 184 धोकादायक इमारती असलेल्या विसर्जन मार्गावर डीजेच्या दणदणाटाने नागरिक भयभीत.

Ganeshotsav 2026 – गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव मात्र, गेल्या काही वर्षांत या उत्सवाचे समीकरण बदलून गेले असून, ‘गणपती म्हणजे डीजेचा दणदणाट’ अशी मानसिकता निर्माण होत आहे. कोल्हापूरमध्ये एकमुखाने डीजेला विरोध होत असताना पुणे जिल्ह्यात डीजेविरोधात आंदोलनाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सातार्यात मात्र ‘दोन बेस आणि दोन टॉप’ साउंड सिस्टिमसाठी परवानगी मिळावी,
यासाठी गणेशोत्सव मंडळांकडून आग्रह धरला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सातार्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी डीजेच्या दुष्परिणामांवर भाष्य करताना, डीजेच्या शेजारी आपल्या घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला बसवून बघा, अशी खोचक टिप्पणी केली होती.
या एका वाक्यातून डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचे गांभीर्य स्पष्ट झाले. मात्र, त्याच बैठकीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या शेवटच्या चार दिवसांत डीजे वाजलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडत टाळ्यांचा कडकडाट केला. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी डीजेला ठाम विरोध करूनही त्यांच्या भूमिकेला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला.
टाळ्या दणदणाटासाठी की ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी?
गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात रात्रभर सुरू राहणारा कर्णकर्कश आवाज ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगरुग्ण, लहान मुले आणि विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सदर बाजार परिसरातील नागरिकांनीही डीजेचा दणदणाट थांबवावा, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच ‘डीजे वाजवा स्पर्धा’ भरविण्याचा उपरोधिक इशारा नागरिकांनी दिला होता.
‘इतर आवाजांचे प्रदूषण होत नाही का?’
डीजे चालक आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही वेगळी बाजू आहे. पारंपरिक वाद्ये, मोठ्या आवाजातील ढोल-ताशे आणि वाहनांचा गोंगाट यामुळेही ध्वनीप्रदूषण होते; मग केवळ डीजेलाच दोष का, असा सवाल ते उपस्थित करतात. त्यांचा प्रश्न रास्त असला तरी ध्वनीप्रदूषणाचे सर्व स्रोत नियंत्रणात आणणे हीच खरी गरज आहे. सातारा शहरातील परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर तब्बल 184 इमारती धोकादायक म्हणून गणल्या गेल्या आहेत. याच मार्गावर काही मोठी रुग्णालयेही आहेत. अरुंद रस्ते, वाढती वाहतूक, गर्दी आणि त्यात डीजेचा प्रचंड आवाज यामुळे आपत्कालीन परिस्थितीत काय होईल, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. श्रद्धा जपा; पण शहाणपणही दाखवा!






