Satara Ganeshotsav: गणेशोत्सवात पुन्हा ‘डीजे’चा दणदणाट? पोलिसांच्या इशाऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ
Satara Ganeshotsav: कोल्हापूर आणि पुण्यात डीजेविरोधात तीव्र सूर उमटत असताना, साताऱ्यात मात्र 'दोन बेस दोन टॉप'साठी गणेशोत्सव मंडळे आक्रमक.

Satara Ganeshotsav – गणेशोत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव. मात्र, गेल्या काही वर्षांत या उत्सवाचे समीकरणच बदलून गेले असून, ‘गणपती म्हणजे डीजेचा दणदणाट’ अशी मानसिकता निर्माण होत आहे. कोल्हापूरमध्ये एकमुखाने डीजेला विरोध होत आहे. पुणे शहर व जिल्ह्यात डीजेविरोधात आंदोलनाची तयारी सुरू आहे.
अशा पार्श्वभूमीवर साताऱ्यात मात्र ‘दोन बेस आणि दोन टॉप’ साउंड सिस्टिमसाठी परवानगी मिळावी, यासाठी गणेशोत्सव मंडळांकडून आग्रह धरला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे साताऱ्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी डीजेच्या दुष्परिणामांवर भाष्य करताना, “डीजेच्या शेजारी आपल्या घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला बसवून बघा,” अशी खोचक टिप्पणी केली होती.
या एका वाक्यातून डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचे गांभीर्य स्पष्ट झाले. मात्र, त्याच बैठकीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या शेवटच्या चार दिवसांत डीजे वाजलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडत टाळ्यांचा कडकडाट केला. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी डीजेला ठाम विरोध करुनही त्यांच्या भूमिकेला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. टाळ्या दणदणाटासाठी की ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी? हा प्रश्न आता साताऱ्यात उपस्थित झाला आहे.
गणेशोत्सवाच्या उत्तरार्धात रात्रभर सुरू राहणारा कर्णकर्कश आवाज ज्येष्ठ नागरिक, हृदयरुग्ण, लहान मुले आणि विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. डीजेचा दणदणाट थांबवावा, अशी मागणी सदरबाजार परिसरातील नागरिकांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच ‘डीजे वाजवा स्पर्धा’ भरविण्याचा उपरोधिक इशारा नागरिकांनी दिला होता.
‘इतर आवाजांचे प्रदूषण होत नाही का?’
डीजे चालक आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही वेगळी बाजू आहे. पारंपरिक वाद्ये, मोठ्या आवाजातील ढोल- ताशे आणि वाहनांचा गोंगाट यामुळेही ध्वनीप्रदूषण होते. मग केवळ डीजेलाच दोष का, असा सवाल ते उपस्थित करतात. त्यांचा प्रश्न रास्त असला तरी ध्वनीप्रदूषणाचे सर्व स्रोत नियंत्रणात आणणे हीच खरी गरज आहे. सातारा शहरातील परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे.
श्रद्धा जपा; पण शहाणपणही दाखवा!
गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे, हे निर्विवाद. श्रद्धा जपायला हवी. मात्र, दुसऱ्याच्या आरोग्यावर, झोपेवर आणि शांततेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. डीजेच्या भिंती उभ्या करुन ध्वनीचा दणदणाट करणे म्हणजे उत्सव साजरा करणे नव्हे तो इतरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार ठरू शकतो, अशी संतप्त भावना ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.






