पारनेर – शहरातील बहुतांश मराठी व इंग्रजी माध्यमातील खासगी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना घरापासून शाळेपर्यंत ने- आण करण्यासाठी नामांकित संस्थांच्या स्कूलबस आहेत. या स्कूलबसमध्ये चालक वाहतूक नियमानुसार विद्यार्थी आसन क्षमता 42 असताना 70 ते 80 विद्यार्थी दाटीवाटीने बसवून प्रवास करत असतात. या चिमुकल्यांच्या जीवाशी या खासगी संस्था खेळत असल्याचा प्रकार 15 ऑगस्टच्या दिवशी दिसून आला. स्कूल बसकडे आरटीओ विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
पारनेर शहरात विविध शैक्षणिक संस्थाच्या बहुतांश शाळा आहेत.प्रत्येक शाळांच्या स्कूलबस व व्हॅन्स आहेत. स्कूल बसची विद्यार्थी व विद्यार्थीनी वाहतूक आसन क्षमता केवळ 42 असताना मात्र बस चालक क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने-आण करत असल्याचे दिसून येत आहे. या बसमध्ये कमीत कमी 60 ते 70 विद्यार्थी दाटीवाटीने बसविले होते. यात भरीस भर म्हणून चालकाच्या केबिनमध्येही दहा ते बारा विद्यार्थ्याना कोंबण्यात आले होते.
बसमधील मोकळ्या जागेतही विद्यार्थी उभे करण्यात आले होते. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांच्या वाहतूक स्कूलवर आरटीओ विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. बस चालक वेगात स्कूल बस चालवत असतात. चालकांच्या या दुर्लक्ष मुळे नकळत एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आसनावर व्यवस्थित बसण्याची व्यवस्था नसल्याने लहान चिमुकल्यांना पाठीचा त्रास होण्याची प्रकार घडत आहे.