– डॉ. मेघश्री दळवी
आजचं युग इंटरनेटचे आहे आणि त्यातही सोशल मीडियाला चिकटून राहणाऱ्या लोकांची संख्या दिसामाजी वाढते आहे. इंटरनेट वापराच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांचा अभ्यास होतो आहे. विशेषत: वास्तव जग आणि आभासी जग यात फरक न करता आल्याने कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. अशा परिस्थितीत एक आशेचा किरण समोर येतो आहे.
ओन्लीअकाउंट्स या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार इंटरनेट वापराचा सरासरी वेळ घटतो आहे. यावर्षी इंटरनेटचा वापर दर दिवशी सरासरी 6 तास आणि 35 मिनिटं होता. तो मागील वर्षापेक्षा 18 मिनिटं कमी होता. ऑनलाइन वावरणाऱ्या 16 ते 64 वर्षे वयोगटातील व्यक्तींचा सर्व्हे केल्यावर या संस्थेला ही आकडेवारी मिळाली आहे. त्यात कॉम्प्युटर, टॅब आणि स्मार्टफोन सर्व मिळून दिवसभरात किती वेळ इंटरनेटचा वापर होतो याची माहिती गोळा झाली.
सात वर्षांपूर्वी, 2016 मध्ये इंटरनेट वापराची जागतिक सरासरी होती साडेसहा तास. पण कोविड महासाथीच्या काळात हा वेळ सात तासांवर गेला होता. साहजिक आहे, आपल्या बाहेर फिरण्यावर बंधन आल्याने ऑफिसचं काम, शाळा, खरेदी, मनोरंजन, सारं काही ऑनलाइनच होत होतं. आता परिस्थिती पूर्ववत झाल्याने वापर घटला आहे. त्यातही बराचसा वेळ व्यावसायिक कामासाठी किंवा बॅंकिंगसारख्या अत्यावश्यक कामासाठी होत असेल, असा अंदाज आहे.
सोशल मीडियावर किती वेळ जातो याची उत्सुकता असेल ना? तो वेळ सरासरी 2 तास आणि 42 मिनिटे होता, गेल्या वर्षीपेक्षा पाच मिनिटे कमी. ऑनलाइन बातम्या वाचण्याचं प्रमाण 6.8 टक्क्यांनी तर ऑनलाइन संगीत ऐकण्याचं प्रमाण 3.3 टक्क्यांनी घटलं आहे. आश्चर्य म्हणजे गेमिंगवर घालवलेला वेळ देखील 7.1 टक्क्यांनी कमी झाला आहे.
अठरा मिनिटं हा काही फार मोठा वेळ नाही. पण इंटरनेटचा वापर न वाढता उलट कमी झाला हे मात्र आशादायक आहे. यामागे काय कारणं असू शकतील? काही ऑफिसेसमध्ये सोशल मीडिया साइट्सवर जायला बंधन असतं. काही वेळा काम जास्त असल्याने गेमिंग किंवा सोशल मीडिया वापर कमी होत असेल. कदाचित ठरवून इंटरनेटपासून दूर राहणे होत असेल. काही जण मुद्दाम प्रत्यक्ष भेटून गप्पाटप्पा करत असतील, खरेदी करत असतील. कदाचित वर्कफ्रॉम होम किंवा हायब्रिड पद्धतीत काम करताना सतत ऑनलाइन राहण्याचा कंटाळा येत असेल.
भारतात आपण सरासरी 6 तास 23 मिनिटं इंटरनेट वापरतो. माफक दरात मुबलक डेटा देणारा देश असल्याने लहानथोर सर्वांना ऑनलाइन जाणे शक्य होतं असं दिसते. तुलनेने डेटा पॅक महाग असलेले युरोपियन देश एक तास कमी वेळ ऑनलाइन काढतात. या परस्परसंबंधातून काही धडा घेता येईल का?