- मयत आजोबांच्या नावाने वैद्यकीय तपासणी केल्याचे उघडकीस
देहूरोड – देहूरोड मुख्य बाजार पेठेतील एका व्यापाऱ्याने व्यवसायाचे परवाना (ट्रेड लायसन) नूतनीकरणासाठी बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी मयत आजोबांच्या नावाने वैद्यकीय तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी संबंधित व्यापाऱ्या विरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे सूचना दिल्या आहेत. मात्र अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील व्यापाऱ्यांची असलेले (ट्रेड लायसन) व्यावसायिक परवान्याची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण करताना यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी, दुकान मालक, चालकाचे आरोग्य तपासणीनंतर आरोग्य प्रमाणपत्र व त्यासोबत लागणारी अन्य कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना काढण्यात आल्या आहेत.
मुख्य बाजारपेठेतील काही व्यापारी बनावट कागदपत्र बनवत असल्याची तक्रार श्रीजित रमेशन यांनी बोर्डाकडे केली. तसेच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केल्यानंतर सतर्क असलेल्या डॉक्टरांनी मुख्य बाजारपेठेतील एक प्रसिद्ध व्यापारी मयत असताना आजोबाच्या नावाने त्याच्या नातवाने आजोबाच्या नावे वैद्यकीय चाचण्या, ईसीजी, एक्स-रे, रक्त चाचण्या केल्याचे उघडकीस आल्यावर या संदर्भातील माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.
त्यानंतर कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल यांनी संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे सूचनाही केली असल्याची माहिती, माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी दिली आहे.