Uruli Kanchan matka raid : उरुळी कांचनमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 10 जणांवर गुन्हा
Uruli Kanchan matka raid : बाजार मैदान येथील शहा यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये सुरू असलेल्या 'कल्याण मटका' अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांची धडक कारवाई.

Uruli Kanchan matka raid – उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजार मैदान परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये सुरू असलेल्या कथित ‘कल्याण मटका’ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 10 जणांविरुद्ध कारवाई केली. शुक्रवारी (दि. 5) सकाळी साडेअकराच्या सुमारास बाजार मैदान येथील शहा यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून मटका स्लिप बुक, कार्बन पेपर तसेच रोख रक्कम जप्त केली आहे.
राजेंद्र केरू वाघमोडे (वय 57, रा. बोरीपार्धी, केडगाव, ता. दौंड) व अतुल अनिल टिळेकर (वय 30, रा. बाजार मैदान, उरुळी कांचन) यांच्याकडून मटका स्लिप बुक, कार्बन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच मनोज अशोक कोर्हाळे, राजेंद्र संभाजी वाघमारे, विजय रमेश जाधव, गजानन अवधूत गेटे, धर्मा लक्ष्मण देढे, सोमनाथ अशोक बेलार,
प्रभाकर विश्वनाथ सोनवणे आणि गणेश शांताराम कांचन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई अक्षय कामठे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहितीदाराकडून बाजार मैदान येथील पार्किंगमध्ये मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
घटनास्थळी दोन जण मटका स्लिप बुक घेऊन उभे असल्याचे, तर त्यांच्या समोर काही जण आकडे लावत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. मात्र पथकाने तत्परता दाखवत सर्वांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत मटका साहित्य आणि रोख रक्कम आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा पंचनामा करण्यात आला आहे.





