Bhor : तुमचे ऑनलाईन पार्सल आलेय, पत्ता सांगा! काहीही ऑर्डर न करता येतात फोन; सावध राहण्याचे भोर पोलिसांचे आवाहन
Bhor : सध्या ऑनलाईन वस्तूंची डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने, कोणतीही ऑर्डर न केलेल्या नागरिकांनाही फोन येत असल्याचे समोर आले आहे. काही सुज्ञ नागरिकांना शंका आल्याने त्यांनी आलेल्या पार्सलचा आधी फोटो व्हॉट्सॲपवर पाठवा, अशी विचारणा केली असता, समोरून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा अनुभव काही स्थानिकांना आला आहे.

महुडे : तुमचे ऑनलाईन पार्सल आले आहे, तुमचा पत्ता सांगा, असे सांगून नागरिकांचा खरा पत्ता मिळवणे आणि थेट घरापर्यंत पोहोचून गुन्हेगारी कृत्य करणे, अशी नवी शक्कल लढवणारी टोळी सध्या महुडे परिसर आणि भोर तालुक्यात सक्रिय झाली आहे. सणासुदीच्या दिवसांत ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले असल्याने या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात आहे.
सध्या ऑनलाईन वस्तूंची डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने, कोणतीही ऑर्डर न केलेल्या नागरिकांनाही फोन येत असल्याचे समोर आले आहे. काही सुज्ञ नागरिकांना शंका आल्याने त्यांनी आलेल्या पार्सलचा आधी फोटो व्हॉट्सॲपवर पाठवा, अशी विचारणा केली असता, समोरून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा अनुभव काही स्थानिकांना आला आहे. पार्सल देण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्ती घरापर्यंत पोहोचू शकते तसेच घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन अनुचित घटना घडू शकतात. त्यामुळे असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला अथवा जवळच्या नातेवाईकांना व शेजाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या किंवा गुन्हेगारी हेतूने माहिती गोळा करणाऱ्या टोळ्या सक्रिय होतात. ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी फोनबाबत नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे. कोणतीही वस्तू ऑर्डर केली नसताना असा फोन आल्यास अथवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ भोर पोलिसांशी संपर्क साधावा.
-निलेश माने, पोलीस निरीक्षक, भोर.





