Uruli Kanchan : कालवा दुथडी, तरी पाणीटंचाई
Uruli Kanchan : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऊस, फळबागा आणि भाजीपाला यांसारखी नगदी पिके आधीच अडचणीत आली आहेत. अशा परिस्थितीत पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यावश्यक असताना शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

उरुळी कांचन : शेताच्या बांधालगत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून वाहत आहे; मात्र शेतात पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. एका बाजूला कमी पावसामुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था आणि दुसर्या बाजूला महावितरणच्या वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्याचा फटका, अशा दुहेरी संकटात पूर्व हवेलीतील शेतकरी सापडले आहेत. कालव्यात पाणी असूनही विजेअभावी ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नसल्याने उरुळी कांचन, सोरतापवाडी आणि शिंदवणे परिसरातील शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऊस, फळबागा आणि भाजीपाला यांसारखी नगदी पिके आधीच अडचणीत आली आहेत. अशा परिस्थितीत पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यावश्यक असताना शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. आठ तासांच्या वीजपुरवठ्याचे नियोजन असतानाही भारनियमन, दुरुस्तीची कामे आणि अन्य कारणांमुळे प्रत्यक्षात पुरेशी वीज मिळत नसल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. परिणामी, जमिनीतील ओलावा कमी होत असून पिके सुकू लागली आहेत.
शेताच्या शेजारून पाणी वाहत असताना केवळ वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नसेल, तर शेतकर्यांनी नुकसान टाळायचे कसे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक गणित कोलमडले असताना आता विजेच्या लपंडावामुळे उरलीसुरली पिके वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट होण्याबरोबरच शेतकर्यांच्या हाती आलेला घासही हिरावला जाण्याची भीती आहे.
कालव्यात पाणी मुबलक प्रमाणात असूनही विजेच्या सततच्या लपंडावामुळे फळबागा, भाजीपाला आणि ऊस पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. दिवसा वीज अजिबात राहत नाही. महावितरणने विजेचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शिंदवणे येथील शेतकरी सचिन विठ्ठल महाडिक यांनी केली.
वीजखंडित होण्याचा शेतीला दुहेरी फटका
वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सिंचनाचे नियोजन विस्कळीत होत आहे. शेतीपंपांवर ताण येऊन ते नादुरुस्त होण्याची शक्यताही वाढत आहे. फळबागा, भाजीपाला आणि ऊस पिकांबरोबरच नर्सरी उद्योगालाही या अनियमित वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांना वारंवार प्रयत्न करावे लागत असून, त्यातून वेळ आणि पैशांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीत महावितरणने तातडीने हस्तक्षेप करून योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
नवीन फिडरचे काम महिनाभरात सुरू होणार
परिसरातील वीजभार कमी करण्यासाठी काम सुरू आहे. शिंदवणे फिडरसाठी नवीन उपकेंद्राच्या जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे. नवीन फिडरचे काम महिनाभरात सुरू होईल. नवीन फिडर टाकणे आणि कॅपॅसिटर बसविण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात वीजपुरवठ्याच्या समस्या कमी होतील, असे महावितरणचे उरुळी कांचन येथील उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे यांनी सांगितले. मात्र, नवीन फिडरचे काम सुरू होऊन वीजपुरवठा सुधारण्यास वेळ लागणार असल्याने तोपर्यंत पिकांचे नुकसान कसे रोखायचे, हा प्रश्न कायम आहे. भविष्यातील कामांची आश्वासने देण्याबरोबरच सध्याचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
पूर्व हवेलीतील वीजसंकटाचे प्रमुख मुद्दे
कालवा भरून वाहतोय; तरी वीजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही.
आठ तासांच्या नियोजित वीजपुरवठ्यातही वारंवार खंड पडत असल्याची शेतकर्यांची तक्रार.
उरुळी कांचन, सोरतापवाडी आणि शिंदवणे परिसरातील शेतकरी त्रस्त.
ऊस, फळबागा, भाजीपाला आणि नर्सरी उद्योगाला नुकसान होण्याचा धोका.
वारंवार वीजखंडित झाल्याने शेतीपंप नादुरुस्त होण्याची भीती.
शिंदवणे फिडरसाठी नवीन उपकेंद्राचा पाठपुरावा; महिनाभरात फिडरचे काम सुरू करण्याचे महावितरणचे आश्वासन.
नवीन कामे पूर्ण होईपर्यंत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी.





