Driver Heart Attack: चालत्या गाडीतच हृदयविकाराचा झटका! कार नियंत्रण सुटून खांबाला धडकली; चालकाचा दुर्दैवी मृत्यू
Driver Heart Attack: पुणे-सोलापूर महामार्गावर घडली दुर्घटना; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने नियंत्रण सुटून कार उलटल्याची माहिती.

Driver Heart Attack- पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. कार लोखंडी खांबाला धडकून उलटली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला, तर कारमधील दोन महिला जखमी झाल्या. बुधवारी (ता. 14) सकाळी 6.40 वाजता हारणा कॉम्प्लेक्ससमोर ही घटना घडली.
प्रमोद प्रकाश महंत (वय 30, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे मृत चालकाचे नाव आहे. मंगल शरद धार (वय 42, रा. शिंदवणे, ता. हवेली) आणि सुरेखा नंदकुमार कांबळे (वय 41, रा. शिवकृपा मार्केटशेजारी, उरुळी कांचन) या जखमी झाल्या आहेत. धार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, 17 टाके पडले आहेत.
त्यांच्यावर सिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कांबळे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि धार या भांडगाव (ता. दौंड) येथील सुहाणा मसाला कंपनीत कामाला जात होत्या. बुधवारी सकाळी तळवडी चौकातून त्या पांढर्या रंगाच्या अर्टिगा कारमध्ये (एमएच 12 वायबी 3789) बसल्या.
काही अंतरावर चालकाने औषधांचे दुकान आहे का, अशी विचारणा करण्यासाठी कार थांबवली. पुढे जात असताना अचानक त्याने डोके स्टिअरिंगवर टेकवले. हृदयविकाराचा झटका आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि ती महामार्गाच्या डाव्या बाजूच्या लोखंडी खांबाला धडकून उलटली.
अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक संतोष झोंबडे आणि माऊली लाड यांनी तिघांना उरुळी कांचन येथील श्री सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रमोद महंत यांना मृत घोषित केले. सुरेखा कांबळे यांना किरकोळ दुखापत झाली असून, मंगल धार यांच्यावर उपचार सुरू आहेत.





