Pimpri : हॉटेलच्या पार्किंगमध्ये झालेल्या वादातून तरुणाला मारहाण

पिंपरी – हिंजवडीतील हॉटेलच्या पार्किंगमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाला बांबू व खुर्चीने मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. ३०) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास हिंजवडी-वाकड रोडवरील टॅन्ड्रम्स क्लब अँड बार समोर पार्किंगमध्ये घडली.
मंगेश रतन इंगवले (वय २५, रा. पिंपरी, पुणे) आणि प्रतिक दयानंद माने (वय २४, रा. रावेत, पुणे) आणि प्रकाश नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी इंगवले आणि माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एका महिलेने शुक्रवारी (दि. ३१) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शैलेश दिपक पवळे (वय २८) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
फिर्यादी आणि तिचा मित्र शैलेश हे जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले असता जेवणानंतर त्या दोघांमध्ये पार्किंगमध्ये आल्यावर वाद झाला. यावेळी आरोपी मंगेश इंगवले हा शैलेशला म्हणाला की तुम्ही येथे येऊन भांडणे का करतात, अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीसोबत शैलेश याचा वाद झाला.
त्यावेळी आरोपी इंगवले म्हणाला की तू मला मारतोस का, तुला खलास करतो” असे म्हणत बांबूने डोक्यात मारहाण केली. आरोपी प्रकाशने हातावर प्रहार केला, तर प्रतिक मानेने प्लास्टिक खुर्चीने पाठीत व इतर ठिकाणी मारहाण केली. या घटनेत शैलेश गंभीर जखमी झाला.




