UGMRT Pune: भारतासह ४ देशांचे शास्त्रज्ञ थक्क! १७४ तासांच्या निरीक्षणात उघड झाले न्यूट्रॉन ताऱ्याचे मोठे गूढ
UGMRT Pune: नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सच्या (NCRA) शास्त्रज्ञांचा अपग्रेडेड जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (uGMRT) साहाय्याने मोठा शोध.

UGMRT Pune: पुणेस्थित अपग्रेडेड जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (यूजीएमआरटी) मदतीने नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी वेगाने फिरणाऱ्या दुर्मिळ न्यूट्रॉन ताऱ्यातून अत्यंत तेजस्वी, अल्पकालीन रेडिओ स्पंदनांचा शोध लावला आहे. पीएसआर जे १२२७-४८५३ नावाच्या या ट्रान्झिशनल मिलिसेकंद पल्सारमधून आढळलेली ही अतितीव्र स्पंदने याच ताऱ्याच्या सामान्य रेडिओ उत्सर्जनापेक्षा तब्बल १० हजार पट अधिक तेजस्वी होती.
ट्रान्झिशनल मिलिसेकंद पल्सारमधून अशा प्रकारची महाकाय स्पंदने आढळण्याची ही पहिलीच वेळ. भारत, अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनमधील खगोलशास्त्रज्ञांनी या पल्सारचे १७४ तास निरीक्षण केले. त्यातून २३५ महाकाय स्पंदने आढळले. यातील सर्वांत कमी कालावधीचा पल्स केवळ १.२८ मायक्रोसेकंदांचा होता. हा पल्सार सेकंदाला तब्बल ५९२ वेळा स्वतःभोवती फिरतो.
न्यूट्रॉन तारे हे मोठ्या ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या अवशेषातून तयार होतात. त्यापैकी ३० मिलिसेकंदांपेक्षा कमी कालावधीत स्वतः भोवती फिरणाऱ्या ताऱ्यांना मिलिसेकंद पल्सार म्हणतात. हे तारे सुरुवातीपासूनच इतक्या वेगाने फिरणारे नसतात. सोबती ताऱ्याकडून अवशेष शोषून घेतल्यामुळे न्यूट्रॉन ताऱ्याचा फिरण्याचा वेग वाढतो आणि तो मिलिसेकंद पल्सार बनतो.
काही दोनतारीय व्यवस्थेमध्ये द्रव्य शोषण्याची अवस्था आणि रेडिओ पल्सारची अवस्था यांच्यात बदल होताना दिसतो. अशा दोन तारीय व्यवस्थांना ट्रान्झिशनल मिलिसेकंद पल्सार म्हणतात. पीएसआर जे१२२७-४८५३ ही अशा केवळ तीन ज्ञात सिस्टीमपैकी एक आहे. या शोधातील महत्त्वाची बाब म्हणजे सामान्य रेडिओ उत्सर्जन पल्सारच्या दोन्ही चुंबकीय ध्रुवांशी संबंधित असताना,
जायंट पल्स मात्र केवळ एका ध्रुवाशी संबंधित भागातून आल्याचे आढळले. इतर जायंट पल्स उत्सर्जित करणाऱ्या पल्सारच्या तुलनेत ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. त्यामुळे हे अत्यंत तीव्र रेडिओ स्पंदने नेमकी कशी आणि पल्सारच्या कोणत्या भागातून निर्माण होतात, याचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे.





