पुणे –सूर्यापेक्षा आकारमान आणि तापमान जास्त असलेल्या, पृथ्वीपासून 154 प्रकाशवर्ष दूर असलेले अकरा एमआरपी (मेन सिक्वेन्स रेडिओ पल्स एमिटर) किंवा अनोखे ताऱ्यांचा शोध पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञांनी लावला आहे.
अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (यूजीएमआरटी) या रेडिओ दुर्बिणीद्वारे हा शोध लावण्यात आला आहे. या संशोधनामुळे ताऱ्यांच्या उत्सर्जनाच्या संकल्पनेला नवी दिशा मिळून ताऱ्यांच्या चुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासाचे नवे दालन खुले झाले आहे.
नव्या संशोधनाची माहिती संशोधक बर्नाली दास यांनी माहिती दिली. संशोधनातील मार्गदर्शक डॉ. पूनम चंद्रा, एनसीआरएचे संचालक प्रा. यशवंत गुप्ता, प्रा. जयराम चेंगलूर, डॉ. जे. के. सोळंकी आदी या वेळी उपस्थित होते. अनोख्या ताऱ्यांच्या संशोधनाचा शोधनिबंध “द ऍस्ट्रोफिजिकल’ जर्नल या संशोधन पत्रिकेसाठी स्वीकारण्यात आला आहे.
डॉ. चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली या संशोधनाचा समावेश असलेला पीएच.डी. प्रबंध बर्नाली दास यांनी पूर्ण केला आहे. अमेरिकेतील कार्ल जी. जान्स्की व्हेरी लार्ज ऍरेसया दुर्बिणीचाही संशोधनासाठी वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी अशाच एका ताऱ्याचा शोध लावला होता. त्यानंतर तसे गुणधर्म दाखवणारा तारा आढळला नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांत बर्नाली दास यांनी अकरा ताऱ्यांचा शोध लावला आहे.
“यूजीएमआरटी’च्या सहाय्याने विशिष्ट वेळी आणि विशिष्ट वारंवारितेला निरीक्षणे घेण्यात आली. ताऱ्याचे तापमान आणि चुंबकीय क्षेत्र रेडिओ लहरींची तीव्रता ठरवण्यात भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच महाकाय चुंबकीय ताऱ्यांवर विशिष्ट ठिकाणी होणाऱ्या स्फोटांची पहिल्यांदाच माहिती मिळाली. प्रचंड ताकदीने लहरी ऊर्जित करणाऱ्या या ताऱ्यांची संख्या वाढल्यामुळे भविष्यातील संशोधनाला वेगळी दिशा मिळेल.
– बर्नाली दास, संशोधक