Pune Cantonment: पुणे कॅन्टोन्मेंटची मदार ५१० कर्मचाऱ्यांवर! गेल्या १८ वर्षांत भरतीच नाही; अनेक प्रकल्प रखडले
Pune Cantonment: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात मंजूर १,११९ पदांपैकी तब्बल ६०९ पदे रिक्त; गेल्या १८ वर्षांपासून कायमस्वरूपी भरती न झाल्याने नागरी सेवांचा फज्जा.

Pune Cantonment- एक हजार ११९ पदे मंजूर असूनही, पुणे कॅन्टोन्मेंटची मदार केवळ ५१० कर्मचाऱ्यांवर असल्याने येथील अनेक प्रकल्प रखडले आहेत. गेल्या १८ वर्षांत पदभरतीच झाली नाही तर जीएसटीचा वाटाही मिळत नसल्याने बोर्डाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये एक हजार ११९ मंजूर पदे आहेत. यामध्ये शिपमेन, शिक्षक, वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक, अभियंते, परिचारिका, डॉक्टर इत्यादींसह वैद्यकीय कर्मचारी अशा विविध पदांचा समावेश आहे.
लेखा विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, अभियांत्रिकी विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन दल यासारखे उपविभागदेखील आहेत. तथापि, मंडळाकडे पुरेसा कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग नाही. या कमतरतेमुळे, नागरिकांचे कोणतेही काम विशिष्ट वेळेत करून घेणे अवघड होते. त्यामुळे, बहुतेक कामे बाहेरून करून घ्यावी लागतात, अशी नागरिकांची तक्रार आहे.
कॅन्टोन्मेंटचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे दोन हजार ९६२ एकर आहे. त्यात आठ प्रभाग आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, नागरिकांची अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. नागरिकांना आपली कामे करून घेण्यासाठी बोर्डाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामात विलंब होतो, त्याचा परिणाम नागरिकांच्या तक्रारींच्या वाढीत होतो आहे.
अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती होत नाही, तसेच दर महिन्याला एक कर्मचारी सेवानिवृत्त होतो. कामाचा भार तेथील कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस वाढत आहे. लेखा विभागात कनिष्ठ लिपिकाची कमतरता असल्याने, सर्व काम वरिष्ठ लिपिकांनाच सांभाळावे लागत आहे. विविध विभागांमध्ये कर्मचारी वर्गच नाही, अशी स्थिती आहे.
विद्याधर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड
कर्मचारी कमतरतेचा सामना करावा लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. दरमहिन्याला एक कर्मचारी सेवानिवृत्त होतो, मात्र त्याजागी नवी भरती होतच नाही. गेल्या काही वर्षांपासून बोर्डात कोणतीच भरती झाली नाही. सन २०२३ मध्ये नवीन कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी जाहिरात दिली होती. परंतु संरक्षण मंत्रालयाने यावर स्थगिती आणली. त्यामुळे, नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. अशा परिस्थितीत, मंडळाची संपूर्ण जबाबदारी अत्यंत मर्यादित कर्मचारी वर्गाच्या खांद्यावर आहे.






