मुंबई – टीव्ही अभिनेते दीपेश भान यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे नेमके निदान अद्याप व्हायचे आहे. तथापि काहीं माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सकाळी सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळत असताना ते घेरी येऊन पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
भाबीजी घर पर है या कॉमेडी शो मधून त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली होती. तसेच त्यांची एफआयआर ही मालिकाही बरीच लोकप्रिय झाली आहे. ते केवळ 41 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
पुर्ण निर्व्यसनी असलेले भान यांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. आरोग्यास हानी पोहचले असे त्यांनी कधीच काहीही केलेले नाहीं तरीपण त्यांच्या वाट्याला असा मृत्यू आल्याबद्दल त्यांच्या सहकारी कलाकारांनी त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
भाबीजी घर पर है या मालिकेतील त्यांचे सहकारी रोहिताश गौड यांनी म्हटले आहे की, आपल्या सोसायटीत क्रिकेट खेळत असताना तो खाली कोसळल्याचे सकाळी 7 वाजता आम्हाला समजले. आणि त्याला तात्काळ रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. तो आनंदी आणि तंदुरुस्त माणूस होता. त्यांचे अचानक निधन झाल्याचे ऐकून धक्का बसला. शोचे निर्माते संजय आणि बिनाफर कोहली यांनी सांगितले की, आमच्यासाठी ही एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे.