वॉशिंग्टन- अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर राहणार की पायउतार होणार यावर चर्चा सुरू आहे. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी ज्यो बिडेन यांच्याकडे मतदारांचा कल झुकत असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर जर सत्तांतर झालेच तर ते शांतपणे होणार का, यावरही आता चर्चा झडू लागल्या आहेत.
त्याला कारण आहे, ट्रम्प यांनी या प्रश्नावर दिलेले संदीग्ध उत्तर.
बुधवारी एका पत्रकाराने त्यांना छेडले असता ते म्हणाले की, अगोदर काय होते ते पहावे लागेल. मी बऱ्याच काळापासून मेलवरून येणाऱ्या मतपत्रिकांबाबत तक्रार करतो आहे. तो म्हणजे अगदी विनाशकारी प्रकार आहे. पण सत्ताबदल शांतपणे होणार का, असे ट्रम्प यांना खोदून विचारल्यानंतर आम्हाला या मतपत्रिकांपासून सुटका पाहिजे आहे. आणि सत्ताबदल होणार नाही. पुन्हा तेच प्रशासन राहील असे तुटक उत्तर त्यांनी दिले.
मेलद्वारे केल्या जाणाऱ्या मतदानाला ट्रम्प यांचा विरोध असून डेमोक्रॅटसचे हे कारस्थान असल्याचा त्यांचा आरोप आहे.
निवडणुकीचा निकाल तुम्ही मान्य कराल का, असा प्रश्न विचारल्यावर बघावे लागेल असे उत्तर त्यांनी फॉक्स न्यूजला दिले आहे. त्यामुळे संभ्रमच वाढला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेवर डेमोक्रॅटीक पक्षाचे अध्यक्ष पदाचे माजी उमेदवार बर्नी सॅंडर्स यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका सध्या अनपेक्षित आणि धोकादायक वळणावर उभी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी मतपत्रिकांच्या वैधतेबाबतच शंका उपस्थित केली असून आपल्याला प्रतिकूल निकाल मान्य नसेल असेच संकेत दिले असल्याकडे सॅंडर्स यांनी लक्ष वेधले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सॅंडर्स म्हणाले की, आपल्या लोकशाहीला अभूतपूर्व धोका आहे. ट्रम्प पराभूत झाले तरी आपणच विजय मिळवल्याचे ते घोषित करतील आणि पायउतार होण्यास नकार देतील. त्यामुळे नागरिकांनी एका दुस्वप्नासाठी तयार राहावे असे आवाहन करण्याची सूचनाही त्यांनी माध्यमांना केली.
दरम्यान, मतदारांनी सुरक्षितपणे आणि निर्भयपणे मतदान करावे आणि मतदारांच्या कौलाचा सन्मान केला जाईल या अजेंड्यावरच सिनेटर सॅंडर्स काम करतील असे त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.