Saamana Editorial : ‘रामराज्य’ संपवून ‘रावणराज्य’ सुरू…. ; दसरा मेळाव्याअगोदरच ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; “विचारांचे सोने लुटायचे आणि…”
Saamana Editorial : अयोध्येत राम-सीतेच्या राज्यात चोऱ्या आणि लुटालुटीचा कहर झाला. राम-सीतेचे अलंकार, पैसा खुद्द भाजपच्या रखवालदारांनी चोरला. त्यामुळे श्रीरामाचे पावित्र्य ते काय राहिले?

Saamana Editorial : आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नेस्को सेंटर येथे दसरा मेळावा पार पडणार आहे. या दोन्ही मेळाव्यांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी उबाठा गटाने सामनाच्या अग्रलेखातून दसरा मेळाव्यात कोणत्या मुद्यांवर उद्धव ठाकरे बोलणार हे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
दसऱ्याचा आनंद पुन्हा मिळवायचा असेल तर ‘रेजिम चेंज’ म्हणजे सत्ताबदल घडवायचाच, सत्तेतील रावणांचा पराभव करायचाच, या जिद्दीने पेटून उठायला हवे. दसऱ्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा लोकांच्या भावनांचा स्फोट घडवून विचारांचे सोने लुटेल आणि विचारांचा तिरंगा फडकवत ठेवेल. पांडवांप्रमाणे शमीच्या झाडावरील शस्त्रे काढून लोकयुद्धाचा एल्गार पुकारण्याचा आजचा दिवस आहे. हा दसरा खास आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखातून तीन खोचक सवाल
अग्रलेखात दसरा सणाचे महत्व नमूद करत पांडवांनी कौरवांचा नाश करण्यासाठी शस्त्रपूजा केली, पण महाराष्ट्रात कौरवांच्याच हाती शस्त्रे आहेत व ते सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून हत्या घडवत आहेत. असे म्हणत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अभिनेता टायगर श्रॅाफवर झालेला गोळीबार, ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळीबार आणि कोयत्याने निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या घटनांचा उल्लेख करत अधर्मावर धर्माचा विजय होताना दिसत नाही. धर्माला ग्लानी आलीच आहे व देवाने अवतार घेण्याऐवजी गुंड व झुंड अवतार घेऊन दहशत पसरवत आहेत. अशा वेळी दसऱ्याचा ‘आनंद’ साजरा करायचा कसा?
श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले हे दसऱ्याचे शुभचिंतन म्हणावे, तर आज अनेक माता-भगिनी गुंडांच्या अत्याचाराच्या शिकार झाल्या आहेत. दिल्लीच्या आंदोलनात महिलांचा विनयभंग पोलिसांनीच केला. त्यांना निर्घृणपणे मारले. मुंबईतही तेच घडले. अयोध्येत राम-सीतेच्या राज्यात चोऱ्या आणि लुटालुटीचा कहर झाला. राम-सीतेचे अलंकार, पैसा खुद्द भाजपच्या रखवालदारांनी चोरला. त्यामुळे श्रीरामाचे पावित्र्य ते काय राहिले?
देवी दुर्गेने महिषासुराचे मर्दन केले, पण आज सर्वत्र महिषासुरच माजले आहेत व तेच राज्य करीत आहेत. ही आजच्या दसऱ्याची स्थिती आहे. लोकांच्या जीवनातला आनंद साफ हरवला आहे. ‘रामराज्य’ संपवून जणू ‘रावणराज्य’ सुरू आहे. त्यामुळे कोणत्या विचारांचे सोने लुटायचे आणि सीमोल्लंघन करायचे? हा प्रश्नच आहे. हे तीन सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांवर टीका
महागाई, बेरोजगारीने कहर केला आहे. शेतकरी दुष्काळाच्या वणव्यात होरपळला आहे. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, गुरांना चारा नाही. कर्जाच्या ओझ्यामुळे घरादारांवर बँकांची जप्ती सुरू आहे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच हजारांची उचल देऊन ‘‘आनंद साजरा करा’’ अशी बळीराजाची चेष्टाच केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मोदी-शहांच्या राजवटीत आनंदाचा दुष्काळ
मोदी-शहांच्या राजवटीत आनंदाचा दुष्काळच पडला आहे. म्हणूनच देश पेटून उठलाय. जगातील अनेक राष्ट्रे, खास करून युरोपातील फ्रान्स, इटली, बेल्जियम, जर्मनी, पोर्तुगाल, ग्रीसमध्ये जनता महागाईविरोधात बंड करून उठली आहे. सत्ता उलथवून टाकण्याच्या निर्धाराने जनता रस्त्यावर उतरली आहे. जाळपोळ करीत आहे. भारतातील चित्र यापेक्षा वेगळे नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
Meera Ambedkar: बौद्ध महिला परिषदेत स्त्रीशक्तीचा जागर; मीरा आंबेडकर यांना जीवनगौरव पुरस्कार







