Satej Patil : अन् वारं फिरलं! गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी कसा पलटवला डाव? ‘हे’ मुद्दे ठरले गेमचेंजर
Satej Patil : या निकालानंतर सतेज पाटील यांच्या निवडणूक रणनीतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन कॅबिनेट मंत्री, खासदार आणि आमदारांची ताकद पणाला लावूनही महायुतीला बहुमत मिळवता आले नाही.

Satej Patil : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने मोठे यश संपादन केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे तगडे आव्हान परतवून लावत आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले.
या निकालानंतर सतेज पाटील यांच्या निवडणूक रणनीतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोन कॅबिनेट मंत्री, खासदार आणि आमदारांची ताकद पणाला लावूनही महायुतीला बहुमत मिळवता आले नाही.
मतदारांशी थेट संपर्क ठरला निर्णायक
या निवडणुकीत सतेज पाटील यांनी प्रचारासाठी मोठी मेहनत घेतली. निवडणुकीच्या सुमारे दोन महिने आधीपासूनच त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचत त्यांनी आघाडीला साथ देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण जनसंपर्काचा फायदा निकालात दिसून आला.
‘गोकुळ हा कोल्हापूरचा स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या दावणीला बांधायचा नाही,’ हा मुद्दा त्यांनी प्रचारात प्रभावीपणे मांडला. दूध उत्पादक शेतकरी, सहकार क्षेत्र आणि कोल्हापूरच्या अस्मितेशी निवडणुकीचा संबंध जोडत त्यांनी मतदारांना साद घातली.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी; महायुतीला घराणेशाहीचा फटका?
उमेदवार निवडीचे राजकारणही या निवडणुकीत महत्त्वाचे ठरले. सतेज पाटील यांच्या आघाडीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. दुसरीकडे, महायुतीच्या पॅनेलमधील काही उमेदवारांच्या निवडीवरून नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाइकांना प्राधान्य दिल्याची टीका झाली.
या उमेदवारी वाटपाबाबत नाराजी निर्माण झाल्याचा परिणाम मतदानावर झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका आणि मतदारांशी थेट संपर्क या बाबी समविचारी आघाडीच्या पथ्यावर पडल्याचे मानले जात आहे.
शपथ आणि धार्मिक भावनांच्या मुद्द्यावरूनही चर्चा
निवडणुकीदरम्यान मतदारांना शपथ घ्यायला लावल्याच्या आणि देवीच्या कोपाची भीती दाखवल्याच्या चर्चाही रंगल्या. या प्रकारामुळे धार्मिक भावनांचा वापर करून मतदारांवर दबाव आणल्याचा आरोप राजकीय चर्चेचा विषय ठरला.
कोल्हापूरची अस्मिता, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि सहकार क्षेत्राचे स्वायत्त अस्तित्व यांसारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात असताना धार्मिक धाकाचा वापर झाल्याची भावना काही मतदारांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरली असावी, असे विश्लेषण केले जात आहे.
राजकीय दिग्गजांच्या ताकदीसमोर सतेज पाटलांची बाजी
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीने आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती. मात्र, सतेज पाटील यांनी आखलेली प्रचाराची रणनीती, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क, उमेदवारांची निवड आणि कोल्हापूरच्या अस्मितेचा मुद्दा यांचा एकत्रित परिणाम निकालात दिसून आला.
२५ पैकी १३ जागा जिंकत समविचारी आघाडीने मिळवलेला विजय हा केवळ संख्याबळाचा निकाल नसून कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय प्रभावाचीही चाचणी ठरला आहे. या निकालामुळे सतेज पाटील यांचे स्थान अधिक मजबूत झाल्याची चर्चा असून, महायुतीसाठीही हा निकाल आत्मपरीक्षणाची संधी मानला जात आहे.
Ashok Gehlot: रितू बराला प्रकरण तापलं! मध्यरात्री अशोक गेहलोत आंदोलनात दाखल, नेमकं काय झालं रात्री ?





