Todays Top 10 News: अजित दादांचा ‘तो’ अखेरचा व्हिडिओ समोर ते सोने 70 हजारांपर्यंत घसरणार?… वाचा आजच्या टाॅप बातम्या
Todays Top 10 News: वाचा आजच्या राज्य, देश-विदेशसह टाॅप 10 बातम्या...

Todays Top 10 News: लातूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर तर स्नेहल उटगे उपमहापौर
राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने आपला गड राखत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ७० पैकी ४३ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला, आता महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड झालीय. महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने सोनकांबळे यांच्या रूपाने शहराला महिला महापौर लाभल्यात.
भाजपने २२ जागा मिळवल्या असून त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. नवनिर्वाचित महापौरांनी महिला सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे जाहीर केले, तर उपमहापौरांनी पाणीपुरवठा सुसूत्रीकरण आणि रस्ते विकासाचा शब्द दिलाय. विलासराव देशमुखांच्या वारशावरून गाजलेल्या या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकलेय.
‘या’ लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; 3 महिन्यांचे 4500 रुपये एकत्रित मिळणार
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून ई-केवायसी त्रुटींमुळे रखडलेला लाभ आता एकत्रित मिळणार आहे. जुन्नर येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, त्यांच्या खात्यात आता ४५०० रुपये जमा केले जातील.
सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू असून, पात्र ठरणाऱ्या महिलांना हा निधी त्वरित वितरित केला जाईल. बहिणींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना लखपती पाहण्याचे सरकारचे स्वप्न असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, भविष्यात ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासनही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
अजित दादांचा ‘तो’ अखेरचा व्हिडिओ समोर; मतदारांना केलं होतं भावूक आवाहन
बारामतीकडे प्रवासाला निघण्यापूर्वी अजित पवार यांनी चित्रित केलेला शेवटचा व्हिडिओ आता समोर आला असून, त्यात त्यांनी मतदारांना कळकळीचे आवाहन केले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले, मात्र त्यापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ तयार केला होता.
यात पवार हात जोडून म्हणतात, “मी शब्दाचा पक्का आणि कामाचा माणूस आहे. ग्रामविकासाची किल्ली असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या हाती द्या, मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.” ग्रामीण भागाचा विकास आणि निधीची कमतरता भासू न देण्याचे वचन देत, ‘घड्याळ’ चिन्हासमोरील बटण दाबण्याचे आवाहन त्यांनी यात केले होते. त्यांचा हा संदेश आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.
काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर; आज भारत तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. विकसित भारताच्या प्रवासात गेल्या काही वर्षांत देशाने सर्व क्षेत्रांत वेगवान प्रगती केल्याचे सांगत, भारत आता ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर घसरली होती, मात्र आज भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे मोदी म्हणाले.
युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, जग आता भारताकडे एक ‘विश्वबंधू’ आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहत आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सुधारणांमुळे तरुणांसाठी जागतिक बाजारपेठ खुली झाली असून, भारत जगापुढील आव्हाने सोडवणारा देश बनलाय. २१ व्या शतकाचा हा दुसरा कालखंड स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणेच निर्णायक ठरेल आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करेल, असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
शशी थरूर यांच्या मुलाला नोकरीवरून काढले; वॉशिंग्टन पोस्टमधील कपातीचा फटका
काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पत्रकार इशान थरूर यांना ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मधील मोठ्या कर्मचारी कपातीचा फटका बसलाय. वृत्तपत्राच्या आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा विभागात झालेल्या या बदलांमुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आलेय. इशान यांनी सोशल मीडियावर रिकाम्या न्यूजरूमचा फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला असून, हा दिवस अत्यंत कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
१९८४ मध्ये जन्मलेल्या इशान यांनी येल विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर २००६ मध्ये ‘टाइम मॅगझीन’मधून आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली होती. २०१४ मध्ये ते वॉशिंग्टन पोस्टमध्ये रुजू झाले होते. पत्रकारितेसोबतच त्यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठात अध्यापनाचे कार्यही केले आहे. या कपातीमुळे आंतरराष्ट्रीय पत्रकारिता वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय.
महाकालेश्वर मंदिरात 6 फेब्रुवारीपासून ‘शिव नवरात्र’; 15 फेब्रुवारीला मुख्य महाशिवरात्री
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरात यंदा महाशिवरात्रीनिमित्त ‘शिव नवरात्र’ उत्सवाचा भव्य सोहळा ६ फेब्रुवारीपासून सुरू होतोय. दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीच्या नऊ दिवस आधीपासून हा विशेष उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.
६ फेब्रुवारीला भगवान महाकालांना हळद-चंदनाचा लेप लावून आणि ११ ब्राह्मणांच्या मंत्रघोषात रुद्राभिषेक करून उत्सवाची सुरुवात होईल. ९ फेब्रुवारीला शेषनाग शृंगार, तर ११ फेब्रुवारीला होळकर शृंगार केला जाईल. उत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज महादेवाला विविध रूपांत सजवले जाणार असून १४ फेब्रुवारीला भाविकांना देवाचे ‘शिव तांडव’ रूप पाहायला मिळेल. १५ फेब्रुवारीला मुख्य महाशिवरात्री दिनी भगवान महाकाल राजाच्या रूपात दर्शन देतील.
एपस्टीन प्रकरणावर बिल गेट्स यांचा पश्चाताप; माफी मागत आरोपांचे केले खंडन
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जेफ्री एपस्टीन फाइल्समधील खळबळजनक दाव्यांवर अखेर मौन तोडले आहे. अमेरिकन न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांमध्ये गेट्स यांच्याबद्दल काही गंभीर दावे करण्यात आलेत. यावर स्पष्टीकरण देताना गेट्स म्हणाले की, एपस्टीनसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मला मनापासून पश्चाताप होत असून मी त्याबद्दल माफी मागतो.
गेट्स यांनी स्पष्ट केले की, त्यांची आणि एपस्टीनची पहिली भेट २०११ मध्ये झाली होती आणि तीन वर्षांत त्यांनी केवळ काही वेळा एकत्र जेवण केले होते. त्यांनी एपस्टीनच्या वादग्रस्त कॅरिबियन बेटावर कधीही भेट दिली नसल्याचे सांगत रशियन तरुणींशी संबंधित सर्व आरोप फेटाळून लावलेत. केवळ जागतिक आरोग्य निधी उभारण्याच्या उद्देशाने ही चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, गेट्स यांची माजी पत्नी मेलिंडा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, या जुन्या आठवणींमुळे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी काळ पुन्हा ताजा झाला असून, अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे.
सोने 70 हजारांपर्यंत घसरणार? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत
सध्या सोन्याच्या दरातील चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असून, तज्ज्ञांच्या मते सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेतील राजकीय बदल आणि मजबूत होत असलेला डॉलर यामुळे सोन्यावर दबाव वाढलाय.
तसेच रशिया-युक्रेन आणि मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती निवळण्याचे संकेत मिळत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी होईल. गुंतवणूकदार आता सोन्यातून नफा काढून शेअर बाजाराकडे वळतील. जर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याने आपली महत्त्वाची आधार पातळी ओलांडली, तर भारतीय बाजारपेठेत मोठी घसरण पाहायला मिळू शकते. ही घट टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज गुरुवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 54 हजार 570 रुपये होता.
प्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलीय. प्रसिद्ध तेलुगु आणि तमिळ अभिनेत्री जया वाहिनी, ज्यांना चाहते प्रेमाने वासवी किंवा पद्मा म्हणून ओळखत होते, त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. विजयनगरम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जया वाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगाशी (Breast Cancer) लढा देत होत्या.
त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने सहकलाकारांनी त्यांच्या उपचारासाठी निधीही जमा केला होता, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांनी आशा सोडली होती. १९७८ मध्ये जन्मलेल्या जया वाहिनी यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या भूमिकांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. २०१९ मधील ‘रघुपति वेंकैया नायडू’ आणि त्यांचा शेवटचा चित्रपट ‘बहिरभूमि’ यांतील त्यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तेलुगु चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलीय.
विजयासाठी गौतम गंभीर बाप्पाच्या चरणी; सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन
७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. टीम इंडियाच्या यशासाठी त्यांनी विशेष साकडं घातलं. गंभीर यांनी यापूर्वीही महाकालेश्वर आणि कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून ७ फेब्रुवारीला यूएसएविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध ४-१ असा विजय आणि सराव सामन्यातील दमदार कामगिरीमुळे भारताचे मनोबल उंचावलेय.












