Gold Rates: सोने पुन्हा 70 हजारांवर येणार? जागतिक घडामोडींमुळे किमतीत घसरणीचे संकेत; वाचा तज्ज्ञांचे मत
Gold Rates: बाजार तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत आगामी काळात आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामागे प्रामुख्याने जागतिक आणि आर्थिक कारणे कारणीभूत ठरत आहेत.

Gold Rates: सध्या सोन्याच्या दरातील चढ-उतार सामान्य ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचीच झोप उडवत आहेत. कधी सोन्याचे भाव गगनाला भिडतात, तर कधी अचानक त्यात मोठी घसरण पाहायला मिळते. या अस्थिरतेमुळे बाजारात सध्या एकच चर्चा सुरू आहे, सोने पुन्हा ७०,००० रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येईल का? की इथून पुन्हा दरवाढीचा नवा उच्चांक गाठला जाईल?
बाजार तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत आगामी काळात आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामागे प्रामुख्याने जागतिक आणि आर्थिक कारणे कारणीभूत ठरत आहेत.
घसरणीची मुख्य कारणे काय?
१. मजबूत डॉलरचा प्रभाव: अमेरिकेतील राजकीय घडामोडी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे डॉलर सातत्याने मजबूत होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत जेव्हा जेव्हा डॉलरची शक्ती वाढते, तेव्हा सोन्याच्या किमतीवर दबाव येतो. अशा स्थितीत गुंतवणूकदार सोन्यातील पैसा काढून इतर पर्यायांकडे वळतात.
२. जागतिक तणाव निवळण्याची चिन्हे: रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सोन्याला ‘सुरक्षित गुंतवणूक’ (Safe Haven) मानून त्यात पैसे गुंतवत होते. मात्र, आता राजकीय स्तरावर तणाव कमी होण्याचे संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कमी झाले आहे. परिणामी, गुंतवणूकदार सोन्यातून नफा वसुली (Profit Booking) करून शेअर बाजाराकडे वळत आहेत.
७०,००० चा टप्पा गाठणार का?
तज्ज्ञांमध्ये या विषयावर मतमतांतरे असली तरी, अनेकांच्या मते सध्याची परिस्थिती पाहता सोने ७०,००० रुपये प्रति तोळ्यापर्यंत खाली येणे अशक्य नाही. जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने आपला महत्त्वाचा ‘सपोर्ट लेव्हल’ (Support Level) तोडला, तर भारतीय बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. तसेच, रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाल्यास सोन्याची आयात स्वस्त होईल, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत किमती कमी होण्यात होईल.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला –
तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, ही घसरण एका रात्रीत होणार नाही. किमती हळूहळू खाली येण्याची शक्यता आहे. यादरम्यान अधूनमधून दरात किरकोळ वाढही दिसू शकते, परंतु एकूण कल (Trend) हा घसरणीचा राहू शकतो. त्यामुळे खरेदीसाठी घाई न करता बाजाराच्या स्थितीवर लक्ष ठेवणे फायद्याचे ठरेल.
(टीप – ही बातमी माहितीसाठी आहे. दैनिक प्रभात कधीही कोणालाही गुंतवणूकीचा सल्ला देत नाही.)





