Stock Market: सेन्सेक्समधील 30 प्रमुख शेअर्सपैकी केवळ ‘हे’ 4 वधारले; गुंतवणूकदारांचे 2.52 लाख कोटींचे नुकसान
Stock Market: सेन्सेक्स ५०३.७६ अंकांनी (०.६०%) घसरून ८३,३१३.९३ वर बंद झाला, तर निफ्टी ५० मध्ये १३३.२० अंकांची (०.५२%) घसरण होऊन तो २५,६४२.८० च्या पातळीवर स्थिरावला.

Stock Market: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) उद्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या पतधोरण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, आज शेअर बाजारात सावधगिरीचे वातावरण पाहायला मिळाले. सेन्सेक्सच्या वीकली एक्सपायरीमुळे बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली, ज्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. दिवसभराच्या चढ-उतारानंतर मुंबई शेअर बाजारातील (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.५२ लाख कोटी रुपयांनी घटले आहे.
बाजारात विक्रीचा दबाव –
व्यापाराच्या शेवटी, सेन्सेक्स ५०३.७६ अंकांनी (०.६०%) घसरून ८३,३१३.९३ वर बंद झाला, तर निफ्टी ५० मध्ये १३३.२० अंकांची (०.५२%) घसरण होऊन तो २५,६४२.८० च्या पातळीवर स्थिरावला. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाआधी गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याचे चित्र आज दिसून आले.
मेटल क्षेत्राला सर्वाधिक फटका –
क्षेत्रनिहाय कामगिरी पाहता, आज मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे निफ्टी मेटल इंडेक्स १ टक्क्यांहून अधिक कोसळला. दुसरीकडे, पीएसयू बँक आणि हेल्थकेयर सेक्टरने बाजार सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना इतर क्षेत्रांकडून साथ मिळाली नाही. या दोन्ही निर्देशांकात अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी वाढ नोंदवण्यात आली.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट –
४ फेब्रुवारी रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ₹४,६९,१६,२०७.२६ कोटी होते. आज व्यवहार बंद होताना ते ₹४,६६,६३,८६८.६७ कोटींवर आले. म्हणजेच अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे अंदाजे २,५२,३३८ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
सेन्सेक्सचे केवळ ४ शेअर्स ‘नफ्यात’ –
सेन्सेक्समधील ३० प्रमुख शेअर्सपैकी केवळ ४ शेअर्स आज वधारले. यामध्ये ट्रेंट, टाटा स्टील आणि एसबीआय हे तेजीमध्ये होते. तर इटरनल, एअरटेल आणि बीईएल या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.
दरम्यान, आज बाजारात एकूण ४,३४२ शेअर्सचे व्यवहार झाले. त्यामध्ये १,७२७ शेअर्समध्ये वाढ झाली. २,४४७ शेअर्स घसरले तर ७५ शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर तर ९४ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकावर राहिले.





