Jaya Vahini Death: ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज अपयशी; प्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
Jaya Vahini Death: १९७८ मध्ये जन्मलेल्या जया वाहिनी यांनी आपल्या करिअरची सुरुवात शून्यातून केली होती. 'वासवी' किंवा 'पद्मा' या नावाने त्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत्या. विशेषतः टीव्ही मालिकांमधील त्यांच्या नकारात्मक (Negative) भूमिकांनी त्यांना घराघरांत ओळख मिळवून दिली.

Jaya Vahini Death: तेलुगू आणि तमिळ चित्रपट तसेच टीव्ही मनोरंजन विश्वातून एक दुखद बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या (स्तनाचा कर्करोग) गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मैत्रिणीने दिली निधनाची माहिती –
जया वाहिनी यांच्या निधनाची पुष्टी त्यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री कराते कल्याणी यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे. कल्याणी यांनी एक भावूक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी माझ्या या बहिणीला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण काही वेळापूर्वी विजयनगरममध्ये तिची प्राणज्योत मालवली. देव तिच्या आत्म्यास शांती देवो.” जया आणि कल्याणी या लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या, त्यामुळे या निधनाने कल्याणी यांना मोठा धक्का बसला आहे.
गरिबी आणि आजारपणाचा दुहेरी वार –
जया वाहिनी यांचा कॅन्सरशी दिलेला लढा अत्यंत वेदनादायी होता. आजारपणामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली होती. त्यांच्या उपचारासाठी कराते कल्याणी आणि इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनी निधी गोळा करण्याचा प्रयत्नही केला होता. चाहत्यांनीही मदतीचा हात पुढे केला होता, मात्र कॅन्सर शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याने डॉक्टरांनी अखेर हात टेकले. त्यानंतर त्यांना विजयनगरम येथील त्यांच्या मूळ गावी हलवण्यात आले होते.
नकारात्मक भूमिकांमुळे मिळाली ओळख –
१९७८ मध्ये जन्मलेल्या जया वाहिनी यांनी आपल्या करिअरची सुरुवात शून्यातून केली होती. ‘वासवी’ किंवा ‘पद्मा’ या नावाने त्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत्या. विशेषतः टीव्ही मालिकांमधील त्यांच्या नकारात्मक (Negative) भूमिकांनी त्यांना घराघरांत ओळख मिळवून दिली.
चित्रपट: २०१९ मध्ये आलेल्या ‘रघुपति वेंकैया नायडू’ या चित्रपटात त्यांनी अभिनेता व्ही.के. नरेश यांच्यासोबत काम केले होते.
शेवटचा चित्रपट: ‘बहिरभूमी’ हा त्यांचा सिनेसृष्टीतील शेवटचा चित्रपट ठरला.
सोशल मीडियावरही त्या सक्रिय होत्या आणि रील्सच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पडद्यावर कडक वाटणाऱ्या जया खऱ्या आयुष्यात अत्यंत साध्या स्वभावाच्या होत्या, अशा आठवणी कलाकार व्यक्त करत आहेत.





