Bill gates: एपस्टीन प्रकरणावर बिल गेट्स यांनी मौन तोडले; व्यक्त केला पश्चाताप, आरोपांचे खंडन
Bill gates: अमेरिकन न्याय विभागाने (DOJ) अलीकडेच ३० लाख पानांचे दस्तऐवज आणि हजारो व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये बिल गेट्स यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या एका ईमेलमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

Bill gates: जगातील सर्वात गाजलेल्या लैंगिक गुन्ह्यांपैकी एक असलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नवीन फाइल्स सार्वजनिक झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अमेरिकन न्याय विभागाने (DOJ) अलीकडेच ३० लाख पानांचे दस्तऐवज आणि हजारो व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये बिल गेट्स यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या एका ईमेलमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर गेट्स यांनी एपस्टीनसोबतच्या संबंधांबद्दल तीव्र खेद व्यक्त केला असून “मला त्या भेटींचा पश्चाताप आहे,” असे म्हटले आहे.
न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये एपस्टीनने लिहिलेल्या एका न पाठवलेल्या ईमेलचा समावेश आहे. यात दावा करण्यात आला होता की, एपस्टीनने गेट्स यांना अमली पदार्थ पुरवण्यास आणि रशियन तरुणींशी असलेल्या संबंधांचे प्रकरण हाताळण्यास मदत केली होती. मात्र, हे सर्व आरोप बिल गेट्स यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
“मी एपस्टीनला पहिल्यांदा २०११ मध्ये भेटलो होतो आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत आम्ही फक्त काही वेळा एकत्र जेवण केले होते. मी त्याच्या खाजगी कॅरिबियन बेटावर कधीही गेलो नाही,” असे स्पष्टीकरण गेट्स यांनी दिले आहे. केवळ जागतिक आरोग्य कार्यासाठी निधी जमा करण्याच्या उद्देशाने ही ओळख झाली होती, जी नंतर चुकीची ठरली, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणावर गेट्स यांची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या नवीन खुलाश्यांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अत्यंत वेदनादायक आठवणी ताज्या झाल्याचे त्यांनी सांगितले. “या नात्याबाबत अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे, परंतु त्याची उत्तरे संबंधित व्यक्तींनीच द्यायला हवीत,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला होता.





