Todays Top 10 News: महाराष्ट्रात 2000 मराठी शाळा बंद?, NCP अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, सोने-चांदी स्वस्त, Galaxy S26 Ultra लाँच आणि बरंच काही… वाचा आजच्या मोठ्या बातम्या
Todays Top 10 News : मराठी शाळांचा वाद, सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड आणि शेतजमिनींचे नवे नियम; सोन्याच्या दरात मोठी घसरण तर सॅमसंगचा नवा फोन लाँच. राजकीय घडामोडींसह क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील 'टॉप' बातम्या वाचा एकाच ठिकाणी.

Todays Top 10 News: 2 हजार मराठी शाळा बंद पडल्या? मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनात सांगितले आकडे
मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात म्हणाले, आपण सगळे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवतो आणि इथे बसून मराठी शाळा बंद असल्याच्या चर्चा करतोय. या पाठीमागे नुसती आपली भावना असून फायदा नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
नाहीतर कुणी मराठी आपली मातृभाषा कशी शिकेल? २ हजार मराठी शाळा बंद करणार, ६५ हजार मराठी शाळा बंद पडल्या, हे आकडे इतक्या आत्मविश्वासाने येतात कुठून? हे मला समजत नाही. त्यामुळे मी आकडेवारीच घेऊन आलोय. आजही आपल्याकडे ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. या शाळांमध्ये एकूण ७० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १६ हजार शाळा अर्थसाहाय्यित आहेत. इंग्रजी शाळांमध्ये ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
सामाईक शेतजमिनींच्या वाटणीसाठी राज्य सरकारची विशेष मोहीम; सातबाऱ्यावर आता स्वतंत्र क्षेत्राची नोंद होणार
राज्यातील सामाईक शेतजमिनींवरून होणारे वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेय. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत आता ७/१२ उताऱ्यावरील प्रत्येक सह-मालकाच्या नावापुढे त्याच्या हक्काचे नेमके क्षेत्र स्वतंत्रपणे नमूद करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या हिश्श्यानुसार स्वतंत्र ‘फार्मर आयडी’ मिळणे सुलभ होईल, ज्याचा फायदा कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पीक कर्ज प्रक्रियेत होणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी तालुका आणि मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार असून, यामुळे जमीन खरेदी-विक्री आणि ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर होऊन शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड; वरळीच्या कार्यकारिणी बैठकीत घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली. वरळी येथील ‘डोम’ संकुलात आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल भावूक झाले.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून काढता येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांनी शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून पक्षाला नवी उंची मिळवून दिली, असेही ते म्हणाले. अजितदादांच्या निधनानंतर आता पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवून संघटनेला अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सविस्तर वृत्त – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड
‘हा भारत आहे, उत्तर कोरिया नाही’; कार्यकर्त्यांवरील कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक
दिल्लीतील ‘एआय समिट’ दरम्यान भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात अर्धनग्न निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरून राजकीय वातावरण तापलेय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका करताना पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीची तुलना उत्तर कोरियाच्या हुकूमशाहीशी केली.
शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा आत्मा असून, सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या निदर्शनानंतर दिल्ली पोलिसांनी हिमाचल प्रदेशातून ३ कार्यकर्त्यांना नाट्यमय घडामोडींनंतर अटक केली. दुसरीकडे, भाजपने या आंदोलनाचा निषेध केला असून संबित पात्रा यांनी पलटवार करताना माजी पंतप्रधान नेहरूंवर गंभीर टीका केलीय.
पंतप्रधान मोदींची जेरूसलममधील ‘याद वाशेम’ स्मारकाला भेट; होलोकॉस्ट पीडितांना वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान जेरूसलममधील ‘याद वाशेम’ या जागतिक होलोकॉस्ट स्मृती केंद्राला भेट दिली. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत त्यांनी दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीकडून मारल्या गेलेल्या ६० लाख ज्यू बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी ‘बुक ऑफ नेम्स हॉल’ची पाहणी करून मानवी प्रतिष्ठेच्या रक्षणाचा संकल्प केला.
यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे राष्ट्रपती आझॅक हर्जोग यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी स्मारक परिसरात वृक्षारोपणही केले. राष्ट्रपती हर्जोग यांनी भारत-इस्रायल शैक्षणिक कनेक्टिव्हिटीवर भर दिला, तर पंतप्रधान मोदींनी हर्जोग यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. नऊ वर्षांतील मोदींचा हा दुसरा इस्रायल दौरा उभय देशांतील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करणारा ठरणार असल्याचे सांगितले जातेय.
युद्धाच्या छायेत अमेरिका-इराणमध्ये जिनेव्हात चर्चा; ओमानच्या मध्यस्थीने शांततेचा प्रयत्न
मध्यपूर्वेत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे तिसऱ्या फेरीची अप्रत्यक्ष अणुचर्चा सुरू झालीय. ओमानच्या मध्यस्थीने होणाऱ्या या चर्चेत इराणचा अणू कार्यक्रम, युरेनियम संवर्धनाची मर्यादा आणि अमेरिकेने लादलेले निर्बंध यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जातेय. एकीकडे अमेरिकेने आपल्या युद्धनौका आणि सैन्य तैनात करून दबाव वाढवला असताना, दुसरीकडे चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युद्धाच्या विनाशकारी परिणामांचा इशारा दिला असून यात कोणाचाही विजय होणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे मुत्सद्देगिरीला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. ओमानने सादर केलेल्या इराणच्या नव्या प्रस्तावांवर अमेरिका सकारात्मक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली तर मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे आहेत, अन्यथा प्रादेशिक संघर्षाचा धोका कायम आहे.
Samsung Galaxy S26 Ultra 5G भारतात लाँच; प्रायव्हसी डिस्प्लेसह मिळणार हाय-टेक फीचर्स
सॅमसंगने सॅन फ्रान्सिस्को येथील ‘गॅलेक्सी अनपॅक २०२६’ इव्हेंटमध्ये आपला बहुप्रतिक्षित ‘गॅलेक्सी S26 अल्ट्रा ५जी’ स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच केलाय. हा फोन प्रामुख्याने एआय तंत्रज्ञान आणि युजर प्रायव्हसीवर केंद्रित असून यामध्ये इन-बिल्ट ‘प्रायव्हसी डिस्प्ले’ हे फिचर देण्यात आलेय, ज्यामुळे बाजूला बसलेल्या व्यक्तीला तुमच्या स्क्रीनवरील मजकूर दिसणार नाही.
भारतीय बाजारपेठेत या फोनची सुरुवातीची किंमत १,३९,९९९ रुपये निश्चित करण्यात आली असून टॉप व्हेरिएंट १,८९,९९९ रुपयांपर्यंत उपलब्ध असेल. या फ्लॅगशिप फोनमध्ये ६.९ इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर आणि २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आलाय. कमी प्रकाशात उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी यात विशेष ‘नाईटोग्राफी’ मोड सुधारण्यात आला असून ५००० mAh ची बॅटरी आणि अँड्रॉइड १६ वर आधारित ऑपरेटिंग सिस्टम यामध्ये मिळते. कोबाल्ट व्हायोलेट आणि स्काय ब्लू अशा आकर्षक रंगांमध्ये हा फोन ग्राहकांना खरेदी करता येईल.
सविस्तर वृत्त – Samsung Galaxy S26 Ultra 5G भारतात लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या सर्वकाही
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल 11,000 रुपयांनी स्वस्त
जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम आज भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळाला असून, सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालीय. घरगुती हाजिर बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५९,०४० रुपयांपर्यंत खाली आला आहे. विशेषतः चांदीच्या दरात मोठी पडझड झाली असून ती प्रति किलो ११,००० रुपयांनी स्वस्त झालीय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही सोन्याचे दर १.१५ टक्क्यांनी घसरून १,५९,२९५ रुपयांवर आलेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज २२ कॅरेट सोन्याचा दर १,५५,२३० रुपये, १८ कॅरेटचा दर १,२८,८३० रुपये आणि १४ कॅरेटचा दर १,०२,५८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेलाय. लग्नसराईच्या काळात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासा मानली जातेय.
‘द केरला स्टोरी 2’ च्या प्रदर्शनाला केरळ उच्च न्यायालयाकडून स्थगिती
बहुचर्चित आणि वादग्रस्त ‘द केरला स्टोरी २ – गोज बियॉन्ड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला केरळ उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिलीय. या चित्रपटामुळे राज्याची प्रतिमा मलीन होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय घेतला. निर्मात्यांनी चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे म्हटले असले तरी, चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो न्यायालयाला दाखवण्यास नकार दिल्याने न्यायमूर्तींनी कडक ताशेरे ओढले.
केंद्र सरकारने सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राचे समर्थन केले असले तरी, पुढील सुनावणीपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत. यामुळे २७ फेब्रुवारी रोजी नियोजित असलेली या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची वाट आता बिकट झाली असून, चित्रपटसृष्टीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध सामाजिक शांतता असा नवा वाद निर्माण झालाय.
सविस्तर वृत्त – ‘द केरळ स्टोरी २’ अडकला कायद्याच्या कचाट्यात; चित्रपटाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार
तेंडुलकर-सूर्यवंशीची ‘दबंगगिरी’; डी.वाय. पाटील टी-20 चषकात ‘ब्लू’ टीमचा विजय
डी.वाय. पाटील टी-२० चषक २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकरच्या जोडीने मैदानात हाहाकार माजवला. इंडियन नेव्हीने दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने अवघ्या १९ चेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावांची स्फोटक खेळी केली. वैभवने रचलेल्या पायावर अर्जुन तेंडुलकरने विजयाचा कळस चढवला.
अर्जुनने ७ व्या क्रमांकावर येत २९ चेंडूंत नाबाद ५५ धावा कुटल्या आणि शेवटच्या षटकात षटकार खेचून संघाला ५ चेंडू आणि ५ गडी अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या दोघांनी एकत्रितपणे केवळ ४८ चेंडूंत ११८ धावा फटकावत नेव्हीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या विजयामुळे डी.वाय. पाटील ‘ब्लू’ संघाने स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केलेय.











