Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या महत्वाच्या बैठकीत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. ही बैठक मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय डोम (NSCI Dome) येथे आयोजित करण्यात आली होती. माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर (विमान अपघातात) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणी आणि केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला मान्यता दिली. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नावही चर्चेत होते. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या आणि कार्यकारिणी सदस्यांच्या एकमताने सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे पवार कुटुंबातील नेतृत्वाची सातत्यता कायम राहण्यास मदत होईल, असा पक्षातील नेत्यांचा विश्वास आहे. सुनेत्रा पवार या सध्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्या राज्यसभेच्या माजी सदस्य राहिल्या असून, पक्षाच्या मजबुतीकरणासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एनसीपी अधिक मजबूत होईल आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारला पाठिंबा देत राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.