DY Patil T20 Cup 2026 : तेंडुलकर-सूर्यवंशीच्या फटकेबाजीने इंडियन नेव्हीचा गोलंदाजांना फोडला घाम, डी.वाय. पाटील ‘ब्लू’ संघ विजयी
DY Patil T20 Cup 2026 : या दोघांनी मिळून केवळ ४८ चेंडूंमध्ये ११८ धावा कुटत डी.वाय. पाटील 'ब्लू' संघाला 'इंडियन नेव्ही' विरुद्ध अविश्वसनीय विजय मिळवून दिला.

Arjun Tendulkar Vaibhav Suryavanshi fifty in DY Patil T20 Cup 2026 : डी.वाय. पाटील टी-२० चषक २०२६ मध्ये क्रिकेट चाहत्यांना एक अनोखा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत पहिल्यांदाच युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर एकाच संघाकडून खेळताना दिसले आणि त्यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनी मिळून केवळ ४८ चेंडूंमध्ये ११८ धावा कुटत डी.वाय. पाटील ‘ब्लू’ संघाला ‘इंडियन नेव्हीविरुद्ध ५ चेंडू आणि ५ गडी अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
वैभव सूर्यवंशीचे ‘वादळी’ अर्धशतक –
इंडियन नेव्ही संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २१९ धावांचे विशाल आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरात २२० धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या डी.वाय. पाटील ‘ब्लू’ संघाकडून वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. वैभवने अवघ्या १९ चेंडूंत ६३ धावांची वादळी खेळी केली. त्याने ३३१.५८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ७ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले आणि विजयाचा भक्कम पाया रचला.
अर्जुन तेंडुलकरने चढवला विजयाचा कळस –
वैभवने रचलेल्या पायावर विजयाची इमारत उभी करण्याचे काम अर्जुन तेंडुलकरने चोख बजावले. ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुनने २९ चेंडूंत नाबाद ५५ धावांची तडाखेबंद खेळी केली. आपल्या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. सामन्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून अर्जुनने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
पहिल्याच भेटीत ऐतिहासिक कामगिरी –
विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच एकत्र खेळत आहेत. वैभवचा हा या स्पर्धेतील पहिलाच हंगाम आहे. या दोघांच्या धावसंख्येची बेरीज केल्यास त्यांनी ४८ चेंडूंत ११८ धावा जोडल्या, ज्यामध्ये एकूण १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.






