Todays Top 10 News: 22 जिल्हा परिषद निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित ते अधिवेशनात अजित दादांच्या आठवणीने वातावरण भावूक, वाचा टाॅप बातम्या

Todays Top 10 News: 22 जिल्हा परिषद निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित
महाराष्ट्रातील ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिलाय.
राहुल रमेश वाघ विरुद्ध केंद्र व महाराष्ट्र सरकार या याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याची विनंती केली, मात्र न्यायालयाने ती फेटाळली. आरक्षणाच्या कायदेशीर मर्यादेबाबत स्पष्टता येईपर्यंत निवडणुका प्रलंबित राहणार असून, बांठिया आयोगाच्या ओबीसी आरक्षण शिफारशींवर न्यायालय लवकरच अंतिम सुनावणी घेणार आहे.
सविस्तर वृत्त – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार
‘वरचे बटण 40 वर्षे असेच खुले राहील’; विधानसभेत रोहित पवार भावूक
अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना आमदार रोहित पवार यांना विधानसभेत अश्रू अनावर झाले. ‘अजितदादा नावाचा जादूगार महाराष्ट्राला हसवत सोडून गेला’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादांच्या शिस्तीच्या आठवणी सांगताना रोहित पवार म्हणाले की, दादा नेहमी मला शर्टचे वरचे बटण लावण्यास सांगायचे, परंतु आता ४०-५० वर्षांनंतर स्वर्गात त्यांची भेट होईल तेव्हाच मी हे बटण लावेन; तोपर्यंत ते आठवण म्हणून उघडेच राहील.
रोहित पवारांनी यावेळी दादांच्या अपघातातील दोषींना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार केला. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राजकीय प्रवासात खंबीर साथ देण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करताना म्हणाले, दादांवरील खोटे आरोप एका गाठोड्यात बांधून समुद्रात विसर्जित करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
अजितदादा हे महाराष्ट्राचे ‘न मिळालेले’ सर्वोत्तम मुख्यमंत्री; फडणवीसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
विधानसभेत अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादा हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होऊ शकले असते, मात्र नियतीने ती संधी हुकवली अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. दादांची प्रशासनावरील पकड, निर्णयक्षमता आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती.
मंत्रालयात सकाळी नऊ वाजता हजर राहणारा आणि फाईलचा सखोल अभ्यास करणारा असा लोकनेता पुन्हा होणे कठीण आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाद्वारे ते नवा विक्रम प्रस्थापित करणार होते, परंतु काळाने घाला घातला. राजकारणापलीकडे आमचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्राने एक उमदे नेतृत्व गमावले: उद्धव ठाकरे
विधान परिषदेत अजित पवार यांच्यावरील शोक प्रस्तावावर बोलताना शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ७० हजार कोटींच्या आरोपांनी खचून न जाता अजित पवारांनी आपल्या कर्तृत्वाने विरोधकांनाही उत्तर दिले आणि त्यांना आपला सहकारी म्हणून स्वीकारण्यास भाग पाडले, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले.
लॉकडाऊनच्या काळात अर्थचक्र सुरू ठेवण्यातील त्यांचे कसब आणि प्रशासनावरील पकड वाखाणण्याजोगी होती. राजकारणात एखाद्याला जीव नकोसा होईल इतके बदनाम करू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. अजित पवारांच्या निधनाने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अजितदादांच्या आठवणीत चित्रा वाघ भावूक
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना भाजप आमदार चित्रा वाघ अत्यंत भावूक झाल्या. अजितदादा म्हणजे कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे आणि कुटुंबातील प्रमुखाप्रमाणे आधार देणारे नेते होते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस सोडतानाचा प्रसंग सांगताना वाघ म्हणाल्या की, त्यावेळी दादांनी फोन करून माझ्यासोबत झालेल्या राजकीय अन्यायाची कबुली दिली होती आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निष्ठेने काम करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.
अजितदादांच्या शिस्तीचा आणि कामाच्या पद्धतीचा उल्लेख करताना त्यांनी एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. दादांच्या कार्यालयातून त्यांच्या वाढदिवसाची खातरजमा करण्यासाठी फोन आला होता, मात्र तो दिवस उजाडण्यापूर्वीच दादांचे निधन झाले. १६ तारखेला दादांचा फोन येणार होता, पण तो आला नाही, असे सांगताना वाघ यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या धैर्याचेही कौतुक केले.
‘शेणाने भरलेले माझे हात दादांनी पेणाला लावले’; अमोल मिटकरी विधानपरिषदेत भावूक
विधानपरिषदेत अजित पवार यांच्यावरील शोक प्रस्तावावर बोलताना आमदार अमोल मिटकरी भावूक झाले. आपला राजकीय प्रवास उलगडताना मिटकरी म्हणाले की, कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ एका व्याख्यानामुळे अजित पवारांनी मला संधी दिली.
बारामतीतील व्याख्यान ऐकल्यानंतर दादांनी स्वतःहून मला बोलावले आणि पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली. प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी केलेल्या कामाची दखल घेत, ‘मी करेन तर यालाच आमदार करेन’ हा शब्द दादांनी पाळला. सामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे शेणाने भरलेले हात पेणाला लावून मला विधीमंडळात पाठवण्याचे काम अजितदादांनी केले, अशा शब्दांत मिटकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; बुधवारी मिळणार डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. रविवारी अचानक उलट्यांचा त्रास होऊन शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आलेत. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांनी व्यवस्थित आहारही घेतलाय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुढील काही दिवस पुण्यातच विश्रांती घेणार असून त्यानंतर मुंबईला रवाना होतील. सध्या चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलेय.
दहशतवादाविरुद्ध भारताचा ‘प्रहार’; केंद्राने जारी केले देशाचे पहिले दहशतवादविरोधी धोरण
देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सोमवारी ‘प्रहार’ नावाचे पहिले राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जारी केले. गृह मंत्रालयाने मांडलेल्या या आठ पानांच्या धोरणात दहशतवादाविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका स्पष्ट करण्यात आलीय. इंटरनेटचा वापर करून होणारी दहशतवादी भरती, जिहादचे उदात्तीकरण आणि डार्क वेबसारख्या तांत्रिक आव्हानांचा सामना करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
या धोरणानुसार, गुप्तचर संस्थांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी ‘मल्टी एजन्सी सेंटर’ आणि ‘जॉइंट टास्क फोर्स’वर भर देण्यात आलाय. दहशतवादाला कोणताही धार्मिक किंवा वैचारिक आधार देऊन त्याचे समर्थन करता येणार नाही, असे सरकारने बजावलेय. सीमावर्ती सुरक्षा, दहशतवादी फंडिंग रोखणे आणि कट्टरतावाद मोडीत काढण्यासाठी संपूर्ण समाज व सरकारी यंत्रणांनी एकत्र येण्याचे आवाहन यात केलेय. मानवाधिकारांचे रक्षण करत दहशतवादी जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी हे धोरण मैलाचा दगड ठरणार आहे.
सविस्तर वृत्त – देशाचे पहिले दहशतवादविरोधी धोरण जाहीर; ‘हा’ असणार धोरणाच्या मागचा मुख्य उद्देश
रश्मिका-विजय उदयपुरात घेणार सात फेरे; ‘विरोश’चा शाही विवाहसोहळा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झालेत. राजस्थानमधील उदयपूर येथे २६ फेब्रुवारी रोजी हा भव्य शाही विवाहसोहळा संपन्न होणार असून, यासाठी हे जोडपे आपल्या कुटुंबियांसह हैदराबादवरून रवाना झालेय. विशेष म्हणजे, हा विवाह दोन वेगवेगळ्या परंपरांनुसार पार पडणार आहे.
२६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता तेलुगु रितीरिवाजांनुसार मुख्य विधी पार पडतील, तर संध्याकाळी रश्मिकाच्या कोडवा समुदायाच्या परंपरेनुसार विशेष विधी पार पडणार आहेत. लग्नाचे प्री-वेडिंग कार्यक्रम २४ आणि २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून यात मेहंदी आणि संगीत सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. चाहत्यांनी प्रेमाने दिलेले ‘विरोश’ हे नाव या जोडीने अधिकृतपणे स्वीकारलेय.
संबंधित वृत्त – ‘या’ सिनेमातून सुरु झालेली रश्मिका-विजय यांची रोमँटिक लव्ह स्टोरी
पल्लेकेलेची नवी खेळपट्टी पाकिस्तानसाठी ठरणार धोका?
टी-२० विश्वचषकाच्या ‘सुपर-८’ मध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ असा असेल. या महत्त्वाच्या सामन्यासाठी आयसीसीने पल्लेकेले येथे नवी आणि वेगवान खेळपट्टी वापरण्याचा निर्णय घेतलाय. या खेळपट्टीवर मिळणाऱ्या अधिक स्विंग आणि बाऊन्सचा फायदा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना मिळू शकतो.
पाकिस्तानची मुख्य ताकद त्यांची फिरकी गोलंदाजी आहे, मात्र वेगवान खेळपट्टीमुळे त्यांची रणनीती अपयशी ठरू शकते. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानला केवळ १ गुण मिळालाय. त्यामुळे इंग्लंडकडून पराभव झाल्यास पाकिस्तानचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगणार असून त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल.









