Todays Top 10 News: सुनेत्रा पवारांची मोदी-शहांशी भेट ते भारत-अमेरिका व्यापार करारात मोठे बदल… वाचा आजच्या टाॅप बातम्या
Todays Top 10 News: सुनेत्रा पवारांची मोदी-शहांशी भेट, बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, अजित पवार विमान दुर्घटनेत घातपाताचा संशय, 'वंदे मातरम'साठी नवीन नियमावली, देशाची विक्री केल्याचा खोटा आरोप, भारत-अमेरिका व्यापार करारात मोठे बदल, जन्मजात 100% दृष्टिहीन महिला बनली जज, मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातील स्वस्त 7-सीटर, राजपाल यादव यांच्या जामिनावर उद्या सुनावणी, डबल सुपर ओव्हरचा थरार

Todays Top 10 News: सुनेत्रा पवारांची मोदी-शहांशी भेट, विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय हालचालींना वेग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण आणि भविष्यातील राजकीय फेरबदलांबाबत खलबते झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार उपस्थित होते. तत्पूर्वी, सुनेत्रा पवार यांनी मुंबईत मंत्रालयातील आपल्या दालनाचा पदभार स्वीकारला. यावेळी अजित पवारांच्या आठवणीने त्या भावूक झाल्या होत्या. आगामी काळात राष्ट्रवादीच्या पुनर्गठनाबाबत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेय.
सविस्तर वृत्त – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट
बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; परळीतील दीपक वाहुळने गमावला प्राण
बीड येथे पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या दीपक वाहुळ या तरुणाचा बुधवारी दुपारी हृदयद्रावक मृत्यू झाला. परळी येथील मांडेखेल गावचा रहिवासी असलेला दीपक सकाळी भरतीसाठी मैदानात दाखल झाला होता. १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर त्याला अचानक डीहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला.
मैदानावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या दीपकने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
सविस्तर वृत्त – पोलीस भरतीदरम्यान ऊसतोड कामगाराच्या मुलाचा मृत्यू; घटनेने महाराष्ट्र हळहळला
विमान आणि पायलट बदलल्याचा खळबळजनक दावा; अजित पवार विमान दुर्घटनेत घातपाताचा संशय
बारामती येथील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेली फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी हिच्या वडिलांनी या घटनेवर गंभीर संशय व्यक्त केलाय. हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा करताना त्यांनी सांगितले की, प्रवासापूर्वी केवळ पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते. यापूर्वी अजित पवारांनी नेहमी काळ्या व करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता, मात्र अपघाताच्या दिवशी त्यांना पांढऱ्या रंगाचे विमान का दिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सकाळी ६ वाजता मुंबईत वाहतूक कोंडीमुळे पायलट पोहोचला नाही हा दावाही त्यांनी फेटाळून लावला. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही विमानातील तांत्रिक बिघाड आणि सर्किट ब्रेकरमध्ये छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त करत मुख्य पायलटच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.
‘वंदे मातरम’साठी नवीन नियमावली; राष्ट्रगीतापूर्वी वाजवणे आता अनिवार्य
केंद्र सरकारने ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार, आता सर्व सरकारी कार्यक्रम, शाळा आणि औपचारिक समारंभांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’ सुरू होण्यापूर्वी वंदे मातरमची ३ मिनिटे १० सेकंदांची सहा कडव्यांची आवृत्ती वाजवली जाईल.
गृह मंत्रालयाने स्पष्ट केलेय की, हे गीत वाजवले जात असताना उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने सन्मानार्थ उभे राहणे बंधनकारक असेल. राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांसह नागरी पुरस्कार सोहळ्यांमध्येही हा नियम लागू असेल, मात्र चित्रपटगृहांना यातून सवलत देण्यात आलीय. राष्ट्रीय भावना आणि गीताचा सन्मान राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.
देशाची विक्री केल्याचा खोटा आरोप; राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ वरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलेय. राहुल गांधी यांनी सरकारवर ऊर्जा सुरक्षा आणि आयटी क्षेत्र अमेरिकेच्या दावणीला बांधल्याचा आणि देशाला विदेशी शक्तींना विकल्याचा खळबळजनक आरोप केला.
या विधानावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल करणार असल्याचे जाहीर केले. ‘देशाला विकण्याची हिंमत असणारा कोणीही जन्माला आलेला नाही’ अशा शब्दांत रिजिजू यांनी गांधींना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींवर टीकास्त्र सोडताना हा अर्थसंकल्प ‘सर्वजन हिताय’ असल्याचे म्हटले असून काँग्रेसच्या काळातच अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याचा पलटवार केला.
भारत-अमेरिका व्यापार करारात मोठे बदल; डाळींवरील सवलत रद्द, खरेदीच्या अटीतही नरमाई
भारत आणि अमेरिका यांच्यातील ताज्या व्यापार करारात अमेरिकेने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून नवीन ‘फॅक्ट शीट’ जाहीर केलीय. या नव्या बदलांनुसार, अमेरिकेने कृषी उत्पादनांच्या यादीतून डाळींचा उल्लेख पूर्णपणे वगळला असून, भारताकडून होणाऱ्या ५०० अब्ज डॉलरच्या खरेदीबाबतची ‘वचनबद्धता’ आता केवळ हेतू’ या स्वरूपात मांडलीय.
रशियन तेल आयातीमुळे भारतीय व्यावसायिकांवर लादलेला २५ टक्के दंड मागे घेण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला असून, यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे. डिजिटल सेवा शुल्काबाबतही अमेरिकेने मवाळ भूमिका घेत केवळ चर्चेची तयारी दर्शवलीय.
जन्मजात 100% दृष्टिहीन महिला बनली जज; केरळच्या थान्या नाथन यांची गगनभरारी
जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो, हे केरळच्या थान्या नाथन यांनी सिद्ध केलेय. जन्मजात १०० टक्के दृष्टिहीन असूनही, थान्या यांनी केरळ न्यायिक सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्याच्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळवलाय. त्यांनी आपल्या या प्रवासात स्क्रीन-रीडर सॉफ्टवेअर, ब्रेल लिपी आणि ऑडिओ नोट्सचा प्रभावी वापर करून अभ्यासातील अडथळे दूर केले.
अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे. कन्नूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेताना त्या वर्गातील एकमेव दिव्यांग विद्यार्थिनी होत्या, मात्र त्यांनी सदैव प्रथम क्रमांक टिकवून ठेवला. विशेष म्हणजे, २०१३ मध्ये राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे देशातील पहिले १०० टक्के दृष्टिहीन न्यायाधीश बनले होते, त्यानंतर हा बहुमान मिळवणाऱ्या थान्या या देशातील दुसऱ्या व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाने शारीरिक मर्यादांवर मात करून स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना नवी उमेद दिलीय.
मध्यमवर्गीयांच्या स्वप्नातील स्वस्त 7-सीटर; निसान ‘ग्रॅवाइट’ 17 फेब्रुवारीला होणार लाँच
येत्या १७ फेब्रुवारीला निसान मोटर इंडिया आपली बहुप्रतिक्षित ७-सीटर ‘निसान ग्रॅवाइट’ (Nissan Gravite) भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून, यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालीय. ही कार प्रामुख्याने रेनो ट्रायबरच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असून ती सब-फोर मीटर कॉम्पैक्ट एमपीव्ही सेगमेंटमध्ये दाखल होईल. आकर्षक एलईडी डीआरएल, मोठी ग्रिल आणि स्पोर्टी बंपरसह या कारचा लूक आधुनिक असेल.
इंटीरियरमध्ये लवचिकता जपण्यासाठी तिसऱ्या रांगेतील सीट काढण्याची सुविधा आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, वायरलेस कनेक्टिव्हिटी यांसारखे प्रगत फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यात १.० लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध असेल. बजेट-फ्रेंडली किमतीत ही कार लाँच झाल्यास ती मारुती एर्टिगासारख्या गाड्यांना तगडी स्पर्धा देऊ शकते.
राजपाल यादव यांच्या जामिनावर उद्या सुनावणी; सिनेसृष्टी मदतीसाठी धावली
प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणी तिहार तुरुंगात असून, त्यांच्या जामीन अर्जावर १२ फेब्रुवारी रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. राजपाल यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान, अजय देवगन आणि सोनू सूद यांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय.
२०१० मध्ये ‘अता पता लापता’ चित्रपटासाठी घेतलेले पाच कोटींचे कर्ज न फेडल्यामुळे राजपाल यांना सहा महिन्यांची शिक्षा झालीय. विशेष म्हणजे, १९ फेब्रुवारीला त्यांच्या पुतणीचे लग्न असून, त्याआधी त्यांना दिलासा मिळण्याची आशा कुटुंबीयांना आहे. संपूर्ण सिनेसृष्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून, आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेय.
डबल सुपर ओव्हरचा थरार; दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर निसटता विजय
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट इतिहासातील सर्वात अटीतटीचा सामना रंगला. १८७ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेली पहिली सुपर ओव्हरही १८-१८ धावांनी टाय झाल्याने दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानसमोर २४ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले होते. रहमानुल्ला गुरबाजने केशव महाराजला सलग ३ षटकार ठोकून खळबळ उडवून दिली. मात्र, शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना गुरबाज झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने ४ धावांनी विजय मिळवला. गुरबाजने मुख्य सामन्यातही ८४ धावांची झुंजार खेळी केली. या पराभवानंतरही अफगाणिस्तानच्या चिवट संघर्षाने चाहत्यांची मने जिंकली.










