वाठार स्टेशन – महाराष्ट्र, कर्नाटकातील भक्तांचे दैवत तसेच पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री घुमाईदेवीची यात्रा आज सुरू झाली असून उद्या (दि. 28) कोजागरी पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गावच्या उत्तरेस चार किलोमीटरवर डोंगरदरीत देवीचे मंदिर आहे. आश्विन शुद्ध त्रयोदशीला देवीचे मानकरी असलेले भोईटे बांधव देवीच्या मंदिरात रात्री जागर व गोंधळाचा कार्यक्रम करतात. त्यानंतर भावेनगर गावातून ढोलताशांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. आश्विन शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच शनिवारी कोजागरी पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस आहे.
यादिवशी पहाटेपासून मंदिरात स्नान, होमहवन, अभिषेक आदी धार्मिक विधी केले जातात. त्यानंतर देवीला पोषाख व दागिन्यांनी सजविले जाते. पालखीचे मानकरी असलेले लेंभे भावकीतील भाविक सकाळी भैरवनाथ मंदिरातून नाथांची मूर्ती व देवीचा टाक (मुखवटा) पालखीतून वाजतगाजत देवीच्या भेटीस नेतात. पालखीसोबत नवसाच्या सासनकाठ्याही असतात. पौर्णिमेला दुपारी श्री नाथ व देवीच्या भेटीचा मुख्य सोहळा होतो. यावेळी गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. त्यानंतर पालखी मिरवणूक पुन्हा भैरवनाथ मंदिरात गेल्यावर सायंकाळी यात्रेचा समारोप होतो.