Samana News Paper : ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे’ असे म्हणण्याची वेळ; सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Samana News Paper : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. तळजाई टेकडी येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही पैलवानांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सुमारे दीडशे ते दोनशे विद्यार्थी नेहमीप्रमाणे तळजाई टेकडीवर वर्कआउट करण्यासाठी आले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेच्या अनुषंगाने आणि पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर सामान्याच्या अग्रलेखातून गृहमंत्र्यांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
पुणे ज्या शहराला एकेकाळी ‘विद्येचे माहेरघर’ आणि ‘सुसंस्कृत’ अशी ओळख होती, ते आता गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांना आता ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर आणि गृहखात्याचा पोलिसांवर वचकच न राहिल्याने कधी काळी शांत असलेले पुणे आता कमालीचे अशांत बनले आहे. पुण्यातील भाईगिरी का वाढतेय, याचे उत्तर गृहखाते सांभाळणाऱ्या देवाभाऊंना नाही तर कुणाला विचारायचे? असा संतप्त सवाल सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.
पुणे पोलिसांसाठी अत्यंत लांछनास्पद
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून पुण्यातील तळजाई टेकडीवर घडलेल्या घटनेवरुन टीका करण्यात आली आहे. तळजाई टेकडीवर घडलेली ताजी घटना ही पुणे पोलिसांसाठी अत्यंत लांछनास्पद आहे. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या दीडशे ते दोनशे तरुण-तरुणींना सुमारे 50-60 पैलवान गुंडांच्या टोळक्याने धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. या गुंडांनी मुलींना शिवीगाळ केली आणि त्यांना बाजूला जाण्यास सांगितले. प्रशिक्षणार्थी मुलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.
थेट मंत्रालयातूनच पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही. पीडित मुले-मुली सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. घटनेच्या जवळपास 11 तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या गुंड टोळक्याविरुद्ध कारवाई करू नये, यासाठी थेट मंत्रालयातूनच पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव होता, अशी माहिती आता पुढे येत आहे, असे म्हटले आहे.
‘भाईगिरी’ संपवणार आहे का?
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सात नवीन पोलीस ठाणी सुरू होत आहेत. जर राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार पोलीस गुन्हेगारांच्याच पाठीशी उभे राहत असतील, तर नवीन कितीही पोलीस ठाणी सुरू झाली तरी त्याचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ‘देवाभाऊं’चे गृहखाते पुण्यातील ही ‘भाईगिरी’ संपवणार आहे का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीसांना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
हेही वाचा : “पहलगाम हल्ल्याचा बदला घ्या, त्या चौघांना…” ; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ओवेसींचे सरकारला मोठे आवाहन





