पुणे जिल्ह्यात धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची शक्यता; सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) जारी केला आहे. यामुळे मुळा, मुठा आणि पवना नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या खडकवासला पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा होत आहे. परिणामी, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज, दि. १५ जुलै २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे.
पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील नागरिकांना नदीपात्रात असलेली वाहने, जनावरे किंवा इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जलसंपदा विभागाने संबंधित प्रशासकीय विभागांना तात्काळ माहिती देऊन आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या संनियंत्रण अधिकारी श्वेता कु-हाडे यांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





