“तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, आपण विचार करू”; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर !

Devendra Fadnavis | Uddhav Thackeray – उद्धवसेनेचे गट नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या आमदारकीचा कार्यकाळ ऑगस्ट २०२५ मध्ये समाप्त होणार असल्याने, बुधवारी त्यांचा निरोप सामारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची खुली ऑफर दिली.
महत्त्वाचे म्हणजे अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सभागृहाच्या बाहेर भेट झाली होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवे २९ ऑगस्टला निवृत्त होत आहेत. पुढच्या अधिवेशनाच्या आधी ते निवृत्त होत आहेत. दानवे यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० चा आहे. मी २२ जुलै १९७० चा आहे.
पण एक सांगतो, जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते आहेत, तोपर्यंत आपण दोघे युवा नेते राहू शकतो. कारण राहुल गांधी माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठे आहेत. त्यामुळे त्यांना जोपर्यंत युवा नेता म्हटले जाणार आहे तोपर्यंत आपल्याला चिंता नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लगावला.
भाषण करत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आता २०२९ पर्यंत तुम्ही काही करायचे नाही. परंतु आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही मात्र, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे.
त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, असा प्रस्ताव फडणवीस यांनी ठेवला. त्यांनी असेही म्हटले की, अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे अनिल परब आता तुम्ही तयारी करा, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांना चिमटा काढला.





