मुंबई – अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या आपल्या ‘सर्कस’ या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. सिद्धार्थ हिंदी चित्रपटात दुसऱ्यांदा रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. मराठीप्रमाणे सिद्धार्थने हिंदीमध्ये देखील आपल्या जबरदस्त कॉमेडी स्टाईलची वेगळी छाप पाडली आहे.यामुळेच सोशल मीडियावर देखील सिद्धूची फॅनफॉलोविंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.नुकतंच सिद्धूने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो त्याला दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना दिसतोय.
एका वृत्तवाहिनीला सिद्धूने दिलेल्या मुलाखतीतील हा काही भाग आहे. ज्यामध्ये त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलय. शिवाय सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या त्याच्या प्रवासाबाबत देखील भाष्य केले आहे. सिद्धार्थ म्हणतो, “आता मला २२ वर्ष झाली या क्षेत्रात काम करून. यादरम्यान मी यश,अपयश ट्रोलिंग सर्वकाही पाहिलं. काही लोक कौतुक देखील करतात. सुरुवातीला लोक म्हणायचे, काय माकडासारखा दिसतो तेव्हा वाईट वाटायचे पण आता मला वाईट वाटत नाही. हे सगळं अनुभवातून आलं आहे. माणसाची उत्क्रांती ज्या माकडापासून झाली त्या माकडाचा अंश माझ्यात आहे याचा मला आनंद आहे.” असं सिद्धार्थ म्हणाला.
View this post on Instagram
आज मी ज्या ठिकाणी आहे त्या क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे टीकाही एन्जॉय करतो असं देखील सिद्धू यावेळी म्हणाला. सर्कस हा सिनेमा रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. यामध्ये रणवीरसिंह सोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील दिसणार आहे. त्यासोबतच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बालभारती या सिनेमात देखील सिद्धार्थाने दमदार काम केले आहे.