मुंबई – अमेरिका जूनपासून वर्ष संपेपर्यंत व्याजदरात किमान तीन वेळा कपात करण्याची शक्यता वाढल्यामुळे डॉलरचा भाव जागतिक चलन बाजारात कमी झाला. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी झाला. अशा अवस्थेत भारतीय रुपयाचे मूल्य गुरुवारी सहा पैशांनी वाढून रुपयाचा भाव 83.13 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. आगामी काळातही रुपयांच्या मूल्यावरील दबाव कमी होण्याची शक्यता आता चलन बाजारातील व्यापारी व्यक्त करू लागले आहेत. ( value of the rupee)
अशा परिस्थितीत भारताकडील परकीय चलन साठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढू शकते. ही भारताच्या परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची घडामोड समजली जात आहे. अमेरिकेत व्याजदर जास्त असल्यामुळे अगोदर डॉलर बळकट होता. अशा परिस्थितीत डॉलर आणि डॉलर केंद्री उत्पादनात परकीय गुंतवणूक जात होती.
आता डॉलर कमकुवत होत असल्यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणुकीबरोबरच भारतीय शेअर बाजार आणि भारतीय कर्जरोखे बाजारात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे रुपयाला आधार मिळत असल्याचे सांगण्यात आले. मात्र असे असले तरी खनिज तेलाच्या किमती अजूनही 85 डॉलर पेक्षा जास्त आहेत. ही भारताच्या दृष्टिकोनातून डोकेदुखी आहे. त्यामुळे डॉलर कमकुवत झाला तरी जर खनिज तेलाच्या किमती वाढल्या तर भारतीय रुपयाच्या मूल्यावर दबाव वाढू शकतो असे समजले जाते.