पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अत्याचाराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीच्या घरात शिरून टोळक्याने तिचा भाऊ, बहिणीला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली. ही घटना लष्कर भागात घडली. तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी अलसबा शेख, जावेद शेख, आयान शेख, सलीम शेख, अल्फेज शेख यांच्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी अलसबा शेखच्या भावाविरुद्ध तरुणीने अत्याचाराची तक्रार दिली होती. तरुणीने तक्रार मागे न घेतल्याने आरोपी तरुणीवर चिडले होते. त्यानंतर आरोपी शेख तरुणीच्या घरात शिरले. तिची लहान बहीण, दोन भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तरुणीच्या लहान बहिणीवर चाकू उगारून तिला धमकावले. बलात्काराची तक्रार मागे न घेतल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. पोलीस उपनिरीक्षक मनीषा वलसे तपास करत आहेत.