(श्रीनिवास वारुंजीकर)
पुणे- गोळाफेक आणि थाळीफेक या क्रीडाप्रकारांत मी राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक जिंकले आहे. अनेक स्पर्धाही मी गाजवल्या असून, एक ना एक दिवस मला देशाचे प्रतिनिधित्त्व ऑलिम्पिक स्पर्धांसारख्या सर्वोच्च पातळीवर करायचे आहे आणि देशासाठी पदकही मिळवायचे आहे, असे सांगताना पुण्यातील कनिष्का ढोले हिचा कंठ दाटून आला होता.
आगामी वर्षातील कनिष्काचा सराव आणि स्पर्धा सहभाग यासाठी वाकड येथील पार्क टिटॅनियम या टाऊनशिपतर्फे तिला मोठे अर्थसहाय्य केले आहे. एखाद्या हौसिंग सोसायटीने एखाद्या खेळाडूच्या पाठीशी उभे रहाणे, ही तशी दुर्मिळ घटना असल्याने, आज देशभर साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने कनिष्का दै. प्रभातशी बोलत होती.
नुकतीच टोक्यो, जपान येथे ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली आणि देशभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुण्यातला लष्कर हद्दीतील एका स्टेडियमला भालाफेकीतील सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा याचे नावही नुकतेच देण्यात आले. देशात क्रीडा क्षेत्रात असेच सकारात्मक वातावरण रहावे आणि आर्थिक अडचणी असलेल्या खेळाडूंना स्पर्धा, सराव आणि आहारासाठी पाठबळ मिळावे या हेतूने, वाकड-पुणे येथील पार्क टिटॅनियम या टाऊनशिपमधील क्रीडाप्रेमींमार्फत आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. इतरांनाही यामधून प्रेरणा मिळावी आणि अधिकाधिक खेळाडूंना आर्थिक मदत मिळावी, असा हेतू यामागे असल्याचे पार्क टिटॅनियमचे अभिजीत बगाडे यांनी सांगितले.
कनिष्का पुढे म्हणाली की, गेल्या सुमारे दोन वर्षांतील करोना महामारीमुळे सराव करणे, स्पर्धेत सहभागी होणे आणि आहारासह रोजचा व्यायाम करणे यावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, आता नव्या जोमाने सराव सुरु केला असून आता साधने आणि स्पर्धा सहभागासाठीचा आर्थिक प्रश्न सुटल्याने मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
कनिष्काचे वडील श्याम ढोले हे एकेकाळचे तायक्वोंदो प्रशिक्षक असून तिची आईसुद्धा महिला कबड्डीमधील राष्ट्रीय पातळीवरची खेळाडू आहे. त्यामुळे घरात क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण असल्याने कनिष्काला प्रोत्साहन देणे आणि तिची कितीही मोठ्या स्पर्धेसाठी तयारी करुन घेण्याची मानसिकता पालकांमध्ये आहे, त्याचा तिला उपयोग होतो आहे.
खेळाडूंना दत्तक घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडवायचे असतील, तर शासकीय मदतीसह समाजातील सर्वच घटकांनी पुढे येणे गरजे आहे. आम्हाला ज्यावेळी कनिष्का ढोलेच्या खेळातील निष्ठेबद्दल समजले,
त्यावेळी आमच्या पार्क टिटॅनियममधील अनेक सदस्यांनी तिला आर्थिक मदत देण्याचे ठरवले आणि 75 व्या स्वातंत्र्यदिनी आम्ही आमच्या मदतीचा पहिला इन्स्टॉलमेंट कनिष्काच्या हवाली केला.
भविष्यात कनिष्का खेळाडू म्हणून जे यश मिळवेल, त्यात आमाचाही थोडा सहभाग असल्याचे समाधान आम्हाला मिळेल, असे पार्क टिटॅनियमचे सदस्य अभिजित बगाडे यांनी सांगितले.