Fatima Sana Fined : शफाली वर्माला डिवचणे पाकिस्तानी कर्णधाराला पडले महागात! मैदानात माज दाखवणाऱ्या फातिमा सनावर ICC ची मोठी कारवाई
Fatima Sana Fined : पाकिस्तान महिला संघाची कर्णधार फातिमा सनावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

Fatima Sana Fined Demerit Point Shafali Verma Send Off Womens Asia Cup 2026 Ind vs Pak : महिला आशिया चषक २०२६ (Womens Asia Cup 2026) स्पर्धेत भारताकडून ७ गडी राखून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना (Fatima Sana) हिला मैदानातील असभ्य वर्तन आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आयसीसीने कठोर शिक्षा सुनावली आहे. भारतीय फलंदाज शफाली वर्माला बाद केल्यानंतर चिथावणीखोर इशारा केल्यामुळे आयसीसीच्या मॅच रेफरींनी फातिमा सनावर सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावला आहे.
शफाली वर्माला डिवचणे भोवले; आयसीसीच्या नियम २.५ चे उल्लंघन!
भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात फातिमा सनाने सलामीवीर शफाली वर्माला बाद केले. मात्र, केवळ विकेटचा आनंद साजरा करण्याऐवजी फातिमाने अत्यंत आक्रमक आणि अपमानास्पद हातवारे करत शेफालीला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा अनुचित इशारा केला. मैदानावरील पंचांनी याची दखल घेत मॅच रेफरी सुप्रिया राणी दास यांच्याकडे तक्रार नोंदवली. रेफरींनी फातिमाला आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले. फातिमाने आपली चूक मान्य केल्याने अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही.
२४ महिन्यांत दुसरा गुन्हा; खात्यात जोडला गेला डिमेरिट पॉइंट –
Fatima Sana fined 10% of her match fees for giving a send off to Shafali Verma. pic.twitter.com/FB8WdeUesD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 7, 2026
Fatima Sana has been sanctioned following an incident in Pakistan’s Asia Cup contest against India.https://t.co/QfFS6ezNJT
— ICC (@ICC) September 7, 2026
दंडाच्या रकमेसोबतच फातिमा सनाला ताकीद देत तिच्या शिस्तभंग नोंदीमध्ये १ डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांत फातिमाने केलेला हा दुसरा गुन्हा ठरला. यापूर्वी ६ ऑगस्ट २०२५ रोजी डब्लिन येथे आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातही तिला १ डिमेरिट पॉइंट मिळाला होता. या ताज्या कारवाईमुळे तिच्या खात्यात आता एकूण २ डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत.
पुन्हा चूक केल्यास बंदी येणार; सावध राहण्याचा इशारा –
आयसीसीच्या कडक नियमांनुसार, २४ महिन्यांच्या आत जर एखाद्या खेळाडूच्या नावावर ४ किंवा त्यापेक्षा जास्त डिमेरिट गुण जमा झाले, तर त्यांचे रूपांतर निलंबन गुणांमध्ये (Suspension Points) होते. दोन निलंबन गुण मिळताच खेळाडूवर थेट १ कसोटी किंवा २ एकदिवसीय/टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी लादली जाते. त्यामुळे भविष्यात आणखी एखादी चूक केल्यास पाकिस्तानी कर्णधारावर थेट मैदानाबाहेर बसण्याची नामुष्की ओढवू शकते.





