Ishan Kishan Records : इशान किशनचे अवघ्या ३० धावांनी हुकले ऐतिहासिक त्रिशतक! तरी लावली तब्बल ‘इतक्या’ विक्रमांची रांग
Ishan Kishan Records : दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात इशान किशनचे त्रिशतक हुकले असले, तरी त्याने अनेक विक्रमांची रांग लावली आहे.

Ishan Kishan 270 Runs Duleep Trophy 2026 Final Misses Triple Century East Zone 708 runs : दुलीप ट्रॉफी २०२६ (Duleep Trophy 2026) च्या अंतिम सामन्यात साऊथ झोनविरुद्ध खेळताना ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने (Ishan Kishan) ऐतिहासिक खेळी साकारली आहे. द्विशतकानंतर इशान आपल्या कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या त्रिशतकाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला होता; मात्र अवघ्या ३० धावांनी त्याचे हे स्वप्न भंगले. असे असले तरी इशानने अनेक दिग्गज फलंदाजांचे विक्रम मोडीत काढत ईस्ट झोनच्या संभाव्य विजयाचा भक्कम पाया रचला आहे.
३३४ चेंडूंत २७० धावांचा पाऊस; रमण लांबा आणि गगन खोडांचा विक्रम हुकला!
इशान किशनने चेपॉकच्या मैदानावर साऊथ झोनच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करत ३३४ चेंडूंत तब्बल २७० धावांची महाकाय खेळी उभारली. या मॅरेथॉन डावात त्याने ३० चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. जर त्याने आणखी ३० धावा केल्या असत्या, तर दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात त्रिशतक झळकावणारा तो केवळ तिसराच फलंदाज ठरला असता. यापूर्वी केवळ रमण लांबा आणि गगन खोडा यांनाच हा पराक्रम करता आला आहे. या एलिट क्लबमध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी थोडक्यात हुकली असली, तरी त्याच्या या खेळीने सर्वांची मने जिंकली.
पहिला विकेटकीपर कर्णधार; एकाच डावात अनेक विक्रमांची नोंद –
A HISTORIC MOMENT FOR CAPTAIN ISHAN KISHAN 🇮🇳 pic.twitter.com/PjfUQbER7f
— Johns. (@CricCrazyJohns) September 7, 2026
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत द्विशतक ठोकणारा इशान किशन ईस्ट झोनचा पहिलाच यष्टिरक्षक कर्णधार ठरला आहे. याशिवाय स्पर्धेच्या फायनलमध्ये द्विशतक ठोकणारा तो केवळ सातवा फलंदाज बनला. या एकाच ऐतिहासिक डावादरम्यान इशानने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले ४००० धावाही पूर्ण केल्या आणि कारकिर्दीतील १० वे प्रथम श्रेणी शतकही नावावर केले. याआधी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्येही अवघ्या ४९ चेंडूंत १०१ धावांची स्फोटक शतकी खेळी साकारली होती.
ईस्ट झोनचा १६३ षटकांत ७०८ धावांचा डोंगर; कुशाग्रचेही दिमाखदार शतक –
STANDING OVATION FOR ISHAN KISHAN AT CHEPAUK FOR HIS 250* IN DULEEP TROPHY FINAL 😍 pic.twitter.com/yEAx9SbP58
— Johns. (@CricCrazyJohns) September 7, 2026
अंतिम सामन्यातील दोन्ही दिवस ईस्ट झोनच्या फलंदाजांनीच गाजवले. १६३ षटकांच्या मॅरेथॉन फलंदाजीत ईस्ट झोनने ७०८ धावांचा महाकाय डोंगर उभारला. इशानच्या २७० धावांशिवाय कुमार कुशाग्रने १०१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ईस्ट झोनचा संघ सर्वबाद होताच दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त घोषित करण्यात आला. आता तिसऱ्या दिवशी साऊथ झोनला ७०८ धावांच्या या अभेद्य आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.





