- संगीता कांबळे
पिंपरी – निवडणुकीचे वारे वाहू लागले की, इच्छुकांची मांदियाळी होते. या वाऱ्याच्या प्रवाहात पक्षांतराला वेग येतो. ज्या पक्षाकडे जास्त बल असेल अशा पक्षात प्रवेश करण्याची स्पर्धाच सुरू होते. त्यात महिला कशा मागे राहतील. ठराविक एका पक्षाचा शिक्का असणाऱ्या नगरसेविकाही पक्षांतर करण्याच्या तयारीत असून अनेक नगरसेविका त्याबाबत चाचपणी करत आहेत. त्यात अश्विनी चिंचवडे, माया बारणे, चंदा लोखंडे या नगरसेविकांच्या पतिराजांनी पक्षांतर केलेच आहे. यानंतर आता अनेक नगरसेविकांच्याही पक्षांतराची चर्चा शहरात जोरदार रंगली आहे.
आशिया खंडातील पिंपरी-चिंचवड महापालिका एकेकाळी श्रीमंत महापालिका मानली जात होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी तिची तिजोरी रिकामी करण्यात कसूर केला नाही. महापालिकेत पन्नास टक्के आरक्षण असल्याने तिजोरीवर डल्ला मारण्यात नगरसेविकाही मागे नसल्याचे वारंवार समोर आले आहे. सध्या महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपला वॉर्ड आणि जागा पक्की करण्याची चिंता आहे. 2017 च्या निवडणुकीत 128 नगरसेवक निवडून आले होते. 50 टक्के आरक्षण असल्याने यातील 64 महिलांना शहराचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. यातील काहीजणी जुन्याजाणत्या आहेत. मात्र, निम्म्यापेक्षा जास्त नगरसेविका या प्रथमच निवडून आलेल्या आहेत. त्यात माहेरचा वारसा मिळविणाऱ्यांसह आपल्या सासरच्यांकडूनही अनेकांना राजकीय वारसा मिळाला आहे. नव्याने निवडून आलेल्या महिला पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तर दोन आणि त्यापेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या काही नगरसेविका पक्षांतराच्या तयारी असल्याची चर्चा आहे.
अश्विनी चिंचवडे, माया बारणे, चंदा लोखंडे आदी नगरसेविकांच्या पक्षांतरावर शिक्कामोर्तब झाले आहे. अश्विनी चिंचवडे यांचे पती गजानन चिंचवडे हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर चिंचवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची पत्नी अश्विनी चिंचवडे यांनी 2012 व 2017 ची निवडणूक शिवसेनेच्या तिकीटावर लढवून त्या निवडून आल्या. मात्र, मागील आठवड्यात गजानन चिंचवडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने अश्विनी चिंचवडे याही भाजपत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे यांचे पती राजू लोखंडे हे राष्ट्रवादीत सहभागी झाल्याने चंदा लोखंडे यांची पुढील राजकीय वाटचाल ही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली होणार आहे. याशिवाय भाजपाच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्याने माया बारणेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी सीमा सावळे, आशा शेंडगे, महापौर माई ढोरे, झामाबाई बारणे, संगीता भोंडवे, जयश्री गावडे, सुजाता पालांडे यांच्यासह अनेक महिलांनी पक्षांतर करत दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयही मिळविला आहे. यातील अनेक महिला सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केवळ राजकीय कोलांटउड्यांमध्ये पुरुषच नव्हे, तर महिला नगरसेविकाही मागे नसल्याचेच यावरून अधारेखित झाले आहे.
सर्वाधिक महिला राष्ट्रवादीच्या वाटेवर
गतवेळी भाजपात जाऊन विजय मिळविणाऱ्या अनेक महिला नगरसेवकांचे पती राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्यामुळे या महिला नगरसेविकाही राष्ट्रवादीत जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपसोबत राहून गेल्या पाच वर्षांमध्ये ज्यांना पदांपासून वंचित ठेवले. त्या महिलांसोबत ज्यांना मानाची पदे मिळाली मात्र स्थानिक नेतृत्त्वाबरोबर ज्यांचे बिनसले त्यांचा पक्षांतराच्या तयारी असलेल्या नगरसेविकांमध्ये समावेश आहे. दिवाळीनंतर या पक्षांतराला वेग येईल, असे सांगितले जात आहे.