नवी दिल्ली – इस्रायलला एफ-३५ लढाऊ विमानांचे सुटे भाग देण्यास नेदरलॅन्डमधील न्यायालयाने स्थगिती दिली आहे. इस्रायलकडून या विमानांचा उपयोग युद्धासाठी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करण्यासाठी केला जाऊ शकतो, हे कारण देऊन न्यायालयाने या सुट्या भागांच्या निर्यातीला स्थगिती दिली आहे.
नेदरलॅन्ड सरकारकडून होणारी ही निर्यात थांबवण्यासाठी मानवतावादी ३ स्वयंसेवी संघटनांनी स्थानिक न्यायालयामध्ये डिसेंबर महिन्यात एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे नेदरलॅन्डमधील अनेक मानवतावादी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.
नेदरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रुट यांनी इस्रायलला भेट देऊन गाझा – इस्रायल संघर्षावर पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांची भेट घेतली होती. रुट यांनी पॅलेस्टिनी पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांची स्वतंत्रपणे भेट घेण्याचेही ठरवले होते. मात्र नेदरलॅन्डने इस्रायलला मदत करू नये यासाठी ऑक्सफॅम नोबिब, पॅक्स नेदरलँड आणि द राइट्स फोरम यां संघटनांनी डिसेंबरमध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. जानेवारी महिन्यात कनिष्ठ न्यायालयाने नेदरलॅन्ड सरकारला इस्रायलला विमानांचे सुटे भाग निर्यात करण्याची अनुमती दिली होती. मात्र दरम्यान जागतिक न्यायालयाने इस्रायलला युद्धबंदी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची सूचना केली.
त्यानंतर अमेरिकेसह इतर अनेक देशांनी इस्रायलला मदत करण्याचा विचार बदलला आहे. इस्रायलकडून मावतावादी हक्कांचे उल्लंघन केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन नेदरलॅन्डमधील वरिष्ठ न्यायालयाने विमानांच्या सुट्या भागांची निर्यात स्थगित करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.