पुणे : प्रेमप्रकरणातून तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. तरुणी प्रियकराच्या हडपसर भागातील घरात मृतावस्थेत सापडल्याने याप्रकरणाचे गुढ वाढले आहे. प्रियकराने तरुणीचा खून करुन तळेगाव दाभाडे परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा संशय येरवडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली. दिव्या निघाटे (वय २३, रा. लोणीकंद) असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे नाव आहे. गणेश शाहूराव काळे (वय २७, सध्या रा. संगमवाडी, येरवडा, मूळ रा. अशोकनगर, ढगे काॅलनी, बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा मूळचा बीडमधील आहे. तो गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहायला आहे. दिव्या ही लोणकंद परिसरात राहायला आहे. दोघे जण बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात कामाला होते. गणेश रुग्णालयात लॅब टेक्निशयन म्हणून काम करत होता. दिव्या परिचारिका होती. रुग्णालयात काम करताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांमधील प्रेमसंबधातील कुणकुण दिव्याच्या कुटुंबीयांना लागली होती. दिव्याच्या कुटुंबीयांनी प्रेमप्रकरणाला विरोध केला होता. शनिवारी (२९ नोव्हेबर) दिव्या घरातून बाहेर पडली. ‘मैत्रिणीकडे चालली आहे’, असे तिने कुटुंबीयांना सांगितले. दरम्यान, दिव्या घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांना काळेपडळ पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार दिली. दरम्यान, रविवारी सकाळी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानक परिसरात गणेशचा मृतदेह सापडला. त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. सुरुवातीला त्याची ओळख पोलिसांना पटली नव्हती. तपासात त्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांचे पथक येरवड्यातील संगमवाडी परिसरात असलेल्या गणेशच्या खोलीत गेले. तेव्हा दिव्या मृतावस्थेत सापडल्याचे उघडकीस आले. दिव्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलायात पाठविण्यात आला आहे. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आहेत. दिव्याचा मारहाण करुन खून करण्यात आला. त्यानंतर गणेशने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.