Indore water issue : इंदूर मधील दूषित पाण्याचा विषय चिघळला; काँग्रेसकडून राज्य सरकारवर टिकेचा भडिमार

Indore water issue – इंदूर शहराच्या भगीरतथपुरा भागात दूषित पाण्यामुळे त्य्गणांच्या मृत्युंची संख्या वाढत असताना इंदूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक कार्यालयाला भेट द्यायला गेल्याने विरोधकांनी टिकेचा भडिमार राज्य सरकारवर केला आहे. काँग्रेसने इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर अशी भेट दिल्याबद्दल टीका केली असून, हे कसले जिल्हाधिकारी, हे तर भाजपा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे.
मध्य प्रदेशची व्यावसायिक राजधानी आणि जवळपास एक दशकापासून देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेले इंदूर, येथील भागीरथपुरा परिसरात पाणी दूषित झाल्यामुळे झालेल्या सात मृत्यूंमुळे चर्चेत आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी म्हणाले की, शिवम वर्मा यांनी इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांच्यासोबत बुधवारी रात्री येथील पंत वैद्य कॉलनीमधील सुदर्शन कार्यालयाला भेट दिली आणि संघाचे माळवा प्रांत प्रचारक राज मोहन सिंह यांच्याशी भागीरथपुरा येथील दूषित पाण्याच्या दुर्घटनेसह विविध विषयांवर चर्चा केली होती. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
पटवारी म्हणाले की, भार्गव यांनी वर्मा यांना आरएसएस कार्यालयात नेले. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे की, ते प्रशासकीय अधिकारी नाहीत. ते भाजप सदस्याप्रमाणे काम करत आहेत. जर तुम्ही कर्तव्यावर असताना राजकीय पक्षांच्या कार्यालयात जात असाल, तर लक्षात ठेवा, काँग्रेस कार्यकर्ते तुमची कार्यशैली सुधरवतील.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात काम केले पाहिजे, मुख्य सचिवांना भेटले पाहिजे आणि मंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. इंदूरमध्ये लोक मरत आहेत, सर्वत्र दूषित पाणी आहे आणि भ्रष्टाचाराची पातळी अकल्पनीय आहे. तरीही, जिल्हाधिकारी काम करत नाहीत. मात्र वारंवार प्रयत्न करूनही वर्मा यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.





