Madhya Pradesh: पाईपलाईन गळतीमुळे इंदूरमध्ये हाहाकार; दूषित पाण्याने 15 जणांचा बळी, राहुल गांधीची प्रतिक्रिया..

इंदूर : शहरातील भागीरथपुरा परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसांत १५ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी गुरुवारी महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजच्या लॅब रिपोर्टमधून झाली. या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेश हादरले असून, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) राज्य सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत अहवाल मागवला आहे.
CMHO डॉ. माधव हसानी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, ड्रेनेजमधील मैला, रासायनिक कचरा आणि साबणाचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने कॉलरासारखे घातक जीवाणू तयार झाले. यामुळे नागरिकांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. सध्या २०१ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, ३२ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी गुरुवारी घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांचे धनादेश देण्यासाठी पोहोचले असता, त्यांना जनक्षोभाचा सामना करावा लागला. “आम्हाला तुमचे पैसे नकोत, आमची माणसे परत द्या,” अशा शब्दांत संतप्त महिलांनी भावना व्यक्त केल्या. गेल्या दोन वर्षांपासून घाण पाण्याची तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणावरून राजकारणही तापले असून, काँग्रेसने सरकारवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे.
अप्पर मुख्य सचिव संजय दुबे यांनी इंदूरमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील इतर भागांतील पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. दुसरीकडे, उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठानेही या प्रकरणाची दखल घेतली असून सरकारकडून ‘स्टेटस रिपोर्ट’ मागवला आहे. दरम्यान, तातडीची उपाययोजना म्हणून खासदार शंकर लालवानी यांनी परिसरात १० नवीन बोअरिंग मंजूर केले असून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
इंदूरमध्ये पाणी नाही, विष वाटले गेले – राहुल गांधी
या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, “इंदूरमध्ये आज पाणी नाही तर विष वाटले जात आहे आणि प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. अनेक घरांमध्ये मातम पसरला आहे, गरीब हतबल आहेत – आणि त्यात भर म्हणून भाजप नेत्यांची अहंकारपूर्ण विधाने समोर येत आहेत. ज्यांच्या घरची चूल विझली आहे, त्यांना सांत्वनेची गरज होती; पण सरकारने त्यांना फक्त घमेंड दाखवली. लोकांनी वारंवार घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्याची तक्रार केली होती, तरीही त्याची दखल का घेतली गेली नाही? पिण्याच्या पाण्यात सांडपाणी (सीवर) मिसळलेच कसे? वेळेत पाणीपुरवठा का थांबवण्यात आला नाही जबाबदार अधिकारी आणि नेत्यांवर कारवाई कधी होणार?
हे प्रश्न ‘फुकट’ विचारलेले नाहीत – ही उत्तरदायित्वाची मागणी आहे. स्वच्छ पाणी मिळणे हा कोणताही उपकार नसून तो जगण्याचा अधिकार आहे. आणि या अधिकाराची हत्या करण्यासाठी भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार, त्यांचे निष्काळजी प्रशासन आणि असंवेदनशील नेतृत्व पूर्णपणे जबाबदार आहे. मध्य प्रदेश आता कुप्रशासनाचा केंद्रबिंदू बनला आहे – कुठे कफ सिरपमुळे मृत्यू, कुठे सरकारी रुग्णालयात उंदरांनी घेतलेले बालकांचे बळी, तर आता सांडपाणी मिश्रित पाणी प्यायल्याने होणारे मृत्यू. जेव्हा जेव्हा गरीब मरतो, तेव्हा मोदीजी नेहमीप्रमाणे गप्पच राहतात.”
इंदौर में पानी नहीं, ज़हर बंटा और प्रशासन कुंभकर्णी नींद में रहा।
घर-घर मातम है, गरीब बेबस हैं – और ऊपर से BJP नेताओं के अहंकारी बयान। जिनके घरों में चूल्हा बुझा है, उन्हें सांत्वना चाहिए थी; सरकार ने घमंड परोस दिया।
लोगों ने बार-बार गंदे, बदबूदार पानी की शिकायत की – फिर भी…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 2, 2026





