Kapil Sharma: शाहरुख खानचं नाव घेतल्याने कपिल शर्मा अडचणीत; सोशल मीडियावर रंगली चर्चा, कॉमेडियनने दिलं स्पष्टीकरण

Kapil Sharma : कॉमेडी आणि मनोरंजनासाठी ओळखले जाणारे कपिल शर्मा जितके आपल्या शोमुळे चर्चेत असतात, तितकेच कधी कधी वादांमुळेही चर्चेत येतात. सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील एका वक्तव्यामुळे कपिल शर्मा सोशल मीडियावर टीकेचा सामना करत आहेत. हा वाद भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार आणि अभिनेता शाहरुख खान यांच्या संदर्भात निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू आणि प्रशिक्षक अमोल मजूमदार उपस्थित होते. या एपिसोडमध्ये कपिल शर्मा यांनी अमोल मजूमदार यांची प्रशंसा करताना त्यांची तुलना शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील कोचशी केली.
कपिल म्हणाले, “क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर लोक ऑनलाईन तुमची तुलना ‘चक दे इंडिया’मधील शाहरुख खानशी करत आहेत. तुम्हीही खूप हँडसम आहात. तुम्हाला शाहरुखसारखं वाटतं का?” यावर अमोल मजूमदार यांनी हसत उत्तर दिलं, “नाही, ‘चक दे इंडिया’सारखं नाही.”
सोशल मीडियावर टीका
कपिलच्या या वक्तव्यावर एका युजरने आक्षेप घेतला. ‘चक दे इंडिया’मधील शाहरुख खानचा कोचचा रोल हा खऱ्या आयुष्यातील हॉकीपटू मीर रंजन नेगी यांच्यावर आधारित असल्याचं सांगत, युजरने कपिलवर टीका केली. एक्सवर त्या युजरने लिहिलं की, “खरा हिरो मीर रंजन नेगी होता, फिल्ममधला नाही.”
Dear sir when did I say Kabir khan? I said Shahrukh khan, and it was in a humorous way, which you will never understand bcoz apka taansane to besura hai hahaha, anyways happy new year. Stay happy n spread happiness. https://t.co/EupBMmgPTy
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) January 1, 2026
कपिल शर्माचं उत्तर
या टीकेला कपिल शर्माने लगेच प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ती पोस्ट री-पोस्ट करत लिहिलं, “महोदय, मी कबीर खान म्हटलंच नाही. मी शाहरुख खान असं म्हटलं होतं, तेही विनोदी अंदाजात. पण ते तुम्हाला कळणार नाही. नववर्षाच्या शुभेच्छा, आनंदी राहा आणि आनंद पसरवा.”
यानंतर एका वकिलानेही कपिलच्या समर्थनार्थ पोस्ट करत म्हटलं की, कपिलने केवळ चित्रपटाचा उल्लेख केला होता. यावर कपिलने, “मी हेच सांगू इच्छित होतो, वकिलापेक्षा चांगलं कोण समजावू शकतं? धन्यवाद,” असं उत्तर दिलं.
शोबद्दल
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवा सीझन नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. पहिल्या एपिसोडमध्ये प्रियंका चोप्रा पाहुणी म्हणून दिसली होती, तर दुसऱ्या भागात भारतीय महिला क्रिकेट संघ सहभागी झाला होता. येत्या भागात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे हे पाहुणे म्हणून झळकणार आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून, कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.





