Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांमध्ये ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली असून, विधानसभा निवडणुकीत महायुतीला याचा राजकीय फायदा झाल्याचंही पाहायला मिळालं. मात्र, या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याने आणि अपात्र महिलाही लाभ घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारने कडक पावलं उचलली. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी *केवायसी प्रक्रिया बंधनकारक* करण्यात आली होती. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. सरकारच्या निर्देशानुसार अनेक लाभार्थी महिलांनी वेळेत केवायसी पूर्ण केली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे केवायसी करूनही अनेक पात्र महिलांना आता योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवायसीदरम्यान काही महिलांच्या नावापुढे चुकीने ‘शासकीय कर्मचारी’ असा उल्लेख झाल्यामुळे त्यांचं अनुदान थांबवण्यात आलं आहे. याशिवाय, केवायसी करताना झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे काही महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा ज्यांच्याकडे वाहन आहे, अशा महिलांनाही योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली असून, पात्र महिलांना न्याय मिळेल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.