अडीस अबाबा (इथिओपिया) – इथिओपियाच्या उत्तरेत लढणाऱ्या 5,600 हून अधिक टिग्रे बंडखोरांना ठार केले असल्याचा दावा इथिओपियाच्या लष्कराने केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सरकारी फौजा आणि टिग्रे बंडखोरांमधील रक्तरंजित संघर्ष सुरू आहे.
आणखी 2,300 बंडखोर जखमी झाले आहेत आणि 2,000 पकडले गेले आहेत, असे वरिष्ठ जनरल बाचा डेबेले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बंडखोर गटाने शेजारच्या अमहारा आणि अफार भागात घुसखोरी केली आहे आणि विद्रोही टिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट इथिओपिया तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लेफ्टनंट जनरल डेबेले यांनी केला आहे. बंडखोरांच्या वतीने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पंतप्रधान अबी अहमद यांचे सरकार आणि बंडखोर “टीपीएलएफ’मधील संघर्ष विकोपाला गेल्यानंतर गेल्या वर्षी या सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली. मात्र, हा संघर्ष सुरू झाल्यानंतर इथिओपियातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. या संघर्षात आतापर्यंत हजारो जण मारले गेले आहेत, तर लक्षावधी लोकांनी शेजारील सुदानमध्ये पलायन केले आहे.