पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

पुणे : पोलीस चौकीत जाऊन हुज्जात घाऊन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि ११ हजार रुपये दंड न्यायालयाने सुनावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.नरावडे यांनी हा आदेश दिला. कृष्णा नरेश धनानी (वय २५, रा. वडगाव शेरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत, पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक बाबुराव जाधव (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार व सुचित्रा नरोटे यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रमोद धिमधिमे यांनी काम पाहिले. ही घटना 18 ऑगस्ट 2015 रोजी गुरूवार पेठेतील देवळाची तालीम येथील जीत वाईन्स येथे घडली.
कृष्णा याने मिठगंज पोलीस चौकीतील महिला पोलीस वापर करित असलेल्या स्वच्छतागृहामध्ये जावून मी मीठगंज पोलिस चौकीसमोर वाईन शॉप चालवतो. मी चौकी विकत घेवू शकतो. तुमची लायकी काय आहे, असे पोलिसांना बोलून हुज्जात घालून सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.





