नगर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नाशिक व नगर येथील उपकेंद्रात सहाय्यक कुलसचिव निवडीसाठी प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. विद्यापीठ निधीतून हंगामी स्वरूपात ठराविक कालावधीसाठी करार पद्धतीने हे पद भरले जाईल. त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत दिली आहे.
गेल्या 18 मेला झालेल्या व्यवस्थापन परिषद बैठकीत सहाय्यक कुलसचिव भरतीला मंजुरी देण्यात आली होती. नुकतेच 26 सप्टेंबरला विद्यापीठाकडून हे पद भरण्यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. पुणे विद्यापीठात विद्यापीठ निधीतून कार्यरत असलेल्या तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि संबंधित पदासाठी शैक्षणिक पात्रता व अनुभवाबाबत निकष पूर्ण करणाऱ्या सेवकांना अर्ज करता येणार आहे. नाशिक व नगर अशी सहाय्यक कुलसचिवांची एकूण दोन पदे भरली जाणार असून, त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.
पाच वर्षांचा कार्यकाळ
सहाय्यक कुलसचिवपदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असण्यासह अन्य विविध अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असेल. सुरवातीस नियुक्ती रुजू तारखेपासून प्रथमतः एक वर्ष कालावधीसाठी हंगामी स्वरूपात करार पद्धतीची असेल. एक वर्ष कालावधीमधील कामकाजासंबंधी विभागप्रमुखांचा अहवाल व शिफारस घेऊन पुढील एक वर्ष कालावधीसाठी मुदतवाढ दिली जाईल. कामकाजासंबंधी विभागप्रमुखांचा अहवाल व शिफारशीवरून उर्वरित तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याचे सूचनापत्रात नमूद केले आहे.